Aditya Thackeray on Alliance with MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे व शिवसेना (ठाकरे) हे पक्ष एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या दोन पक्षांच्या युतीची चर्चा सुरू झाली होती. पाठोपाठ शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील मागे हटले नाहीत. त्यांनी देखील राज ठाकरे यांना प्रतिसाद दिला होता. आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील मनसेला टाळी दिली आहे. “महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र यायला तयार आहोत, म्हणूनच आम्ही मनसेला साद दिली आहे”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, आमदार अंबादास दानवे, आमदार सुनील प्रभू यांनी देखील वारंवार युतीबाबत अनुकूलता दर्शवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी फळी मात्र युतीबाबत अनुकूल नसल्याचं दिसतंय.

आदित्य ठाकरेंची मनसेला टाळी

दरम्यान, स्वतः आदित्य ठाकरे यांनी युतीबाबत केलेल्या वक्तव्यास त्यांचे काका राज ठाकरे प्रतिसाद देणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की “आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना व्यक्त केली आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्या बरोबर यायला तयार असेल आम्ही त्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. काल परवा आमचे नेते दीपेश म्हात्रे व मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं. हे त्याचंच उदाहरण आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचं मन देखील साफ आहे. जो कोणी नेता महाराष्ट्र हितासाठी आमच्याबरोबर यायला तयार असेल, जो पक्ष पुढे येत असेल, आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र येऊन लढू”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमच्या मनातली बातमी लवकरच कळेल : संजय राऊत

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “युतीच्या चर्चेवर कोणीही मौन बाळगलेलं नाही. स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त केली आहे, त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्हे. राज ठाकरे यांच्या इच्छेवर त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांनी देखील अनुकूल भूमिका घेतली आहे. त्यानंतर आम्ही सर्वांनी देखील योग्य भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या मनातली बातमी तुम्हाला लवकरच कळेल”.