शिवसेना (ठाकरे) पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर असून मागील काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असून ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्याची चर्चा आहे. हे खासदार फुटल्याच्या चर्चेनंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून व्हिप जारी करण्यात आला होता. मात्र, तरीही या ६ खासदारांपैकी कोणीही ठाकरे गटाच्या संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहिलं नाही. त्यामुळे हे ६ खासदार फुटल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.
ठाकरे सेनेच्या फुटलेल्या या ६ खासदारांबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर आता आमदार आदित्य ठाकरे यांची देखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं’, असं म्हणत ‘महाराष्ट्र हे घाणेरडं राजकारण मुळीच सहन करणार नाही’, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी फुटलेल्या त्या ६ खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“आज आपला ६० वा वर्धापन दिन. पण पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“कितीही कारणे द्या…सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं आहे. स्वतःला तर विकलंच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचं नाव आणि तुमच्या कुटुंबाचं नावही पणाला लावलं आहे. महाराष्ट्र हे घाणेरडं राजकारण मुळीच सहन करणार नाही. ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
फुटलेल्या ६ खासदारांबाबत संजय राऊत काय म्हणाले?
शिवसेना पक्षात चार वर्षांत दुसऱ्यांदा फूट पडली असून ६ खासदारांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अद्याप फुटलेल्या खासदारांची अधिकृत भूमिका समोर आलेली नसली, तरी त्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार हल्लाबोल होऊ लागला आहे. त्यातच आता या ६ खासदारांमध्ये नेमकं मंत्रीपद कुणी घ्याययचं? यावरून वाद सुरू झालेला असून रात्रीच्या सुमारास त्यावर मध्यम तोडगा काढण्यात आल्याचा दावा शिवसेना उबाठाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केला.
शिवसेनेत फूट पडली नसून बंडखोर खासदारांनी स्वत:ला विकल्याची टीका संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केली. “मी शिवसेनेत ही फूट झाली असं मानत नाही. माणूस विचारांशी बांधीलकी दाखवून फुटतो. एखाद्यानं स्वत:ला बाजारात विकण्यासाठी उभं केलंय आणि कुणी खरेदी केलं तर त्याला फुटणं म्हणत नाही. त्याला विकणं म्हणतात. तसे आमचे ६ लोक दोन दिवसांपूर्वी बाजारात उभे राहिले. त्यांनी स्वत:ची बोली लावली आणि त्या बोलीवर त्यांना विकत घेतलं गेलं. कोणताही महान विचार घेऊन ते फुटलेले नाहीत”, असं राऊत म्हणाले.
