आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत एक मुद्दा मांडला. हा प्रश्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईतल्या बोरिवली या ठिकाणी आहे. तिथे माकडांना बाण मारला गेला, या प्रकरणाची जबाबदारी कुणाची आहे? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंनी जे उदाहरण दिलं तो टोला सत्ताधाऱ्यांना होता.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
दोन महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मास्टर प्लान मुंबई महापालिकेने प्रकाशित केला आहे. शिवाय दुसरी बातमी आली आहे की एका माकडाच्या गळ्यात स्टिलचा बाण मारला गेला आहे. आत्तापर्यंत तिथले आदिवासी बांधव आणि वन्यजीव हे एकमेकांशी कोऑपरेशनमध्ये राहात होते. मात्र आता वन्यजीव धोक्यात आले आहेत. माकडाला बाण मारला, आज एका माकडाला मारलं गेलं. यावर उत्तर देण्याची जबाबदारी कुणाची? वन विभागाने याचं उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
धनुष्यबाण चुकीच्या हातांमध्ये गेला की काय होतं आपण पाहिलं- आदित्य ठाकरे
वानरांना किंवा माकडांना पाहिलं की आपल्याकडे नमस्कार करण्याची प्रथा आहे. मात्र इथे माकडांना बाण मारला जातो आहे. ही बाब दुर्दैवी आहे. जो कुणी धनुर्विद्या शिकवतो आहे आणि हे करतो आहे ते म्हणजे धनुष्य बाण चुकीच्या हातात गेल्यानंतर काय होतं त्याचं उदाहरण आहे. धनुष्य बाण चुकीच्या हातात गेल्यानंतर कसा वापर होतो ते आता कळायला लागलं आहे. शासनाला या माध्यमातून कारवाई करण्याची आवश्यकता आहे. एरवी शूट अॅट साईटच्या ऑर्डर्सही दिल्या जातात. या प्रकरणात असा काही आदेश देणार का? हा माझा सवाल आहे. धनुष्य बाण चुकीच्या हातात गेल्यावर काय होतं ते आपल्याला कळलं आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये शिवसेनेत सर्वात मोठं बंड केलं. त्यांनी पक्षाच्या नेतृत्वालाच आव्हान दिलं. उद्धव ठाकरे यांच्याविरोधातलं हे बंड होतं.ज्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं आणि एकनाथ शिंदे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते. २०२४ मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्यानंतरही महायुतीच्याच सर्वात जास्त जागा आल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त २० जागांवर समाधान मानावं लागलं. एकनाथ शिंदे हे आता सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांच्या विरोधातली टोलेबाजी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातले नेते करत असतात. आज आदित्य ठाकरेंनी केलल्या वक्तव्याकडेही असंच पाहिलं जातं आहे.
