Aditya Thackeray on Nitish Kumar video : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका बुरखाधारी मुलीच्या चेहऱ्यावरील बुरखा ते स्वत:च्या हाताने खाली सरकवत असल्याचं दिसून येत आहे. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातून जोरादार टीका केली जात आहे. महाराष्ट्रातून देखील नितीश कुमार यांच्या या कृतीवर टीका केली जात आहे. तर काही नेत्यांकडून नितीश कुमारांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये कठोर शब्दात टीका केली आहे. मुख्यमंत्री पदावर असलेल्या एका जबाबदार प्रौढ व्यक्तीने असे कृत्य करणे लाजिरवाणी बाब असून असे करण्याचा अधिकार कोणालाही नाही असे अदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.
आदित्य ठाकरेंची पोस्ट
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, “एका प्रौढ आणि मुख्यमंत्र्यासारख्या जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीने बुरख्याला स्पर्श करणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.
दुसर्या कुठल्याही देशात, सत्ताधारी व्यवस्थेने अशा कृत्याबद्दल शिक्षा दिली असती, या कृत्यावर माध्यमांनी कठोर टीका केली असती आणि लाज बाळगून व्यक्तीने सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली असती.
हिजाब असो, घुंघट असो, मास्क असो किंवा त्या महिलेने इतर काही परिधान केलेले असो, कोणालाही तिला स्पर्श करण्याचा किंवा ते काढण्याचा किंवा तिला ते परिधान करायला लावण्याचा अधिकार नाही.
सर्वात घृणास्पद म्हणजे कोणीतरी याचे ‘पित्यासमान’ म्हणत समर्थन करणे किंवा एका मंत्र्यांने म्हणणे की “फक्त नकाबला तर स्पर्श केला, जर त्यांनी इतरत्र स्पर्श केला असता तर काय झाले असते?” ते तुमच्यासाठी पित्यासमान असतील, तिच्यासाठी नाहीत! आणि जरी ते असते, तरी त्यांना असे करण्याचा कोणताही अधिकार मिळत नाही.
जर ही राजकारणाची पातळी असेल आणि तुम्हाला ती मान्य असेल, तर लक्षात ठेवा, हे आज त्यांच्याबरोबर झाले असले तरी उद्या हे तुमच्यापर्यंत पोहचेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर अन्याय होत आहे असे समजून त्यांच्यासाठी आवाज उठवत नाहीत, तेव्हा अन्याय तुमच्यापर्यंत पोहचेल आणि तुम्ही त्याविरोधात आवाज उठवू शकणार नाहीत.
किती लाजिरवाणी गोष्ट आहे!”
राजदटची नितीश कुमारांवर टीका
लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षाने म्हणजेच आरजेडीने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये, हिजाब परिधान केलेल्या एका महिलेच्या चेहऱ्यावरील हिजाब बाजूला काढताना मुख्यमंत्री नितीश कुमार दिसून येतात. नितीश कुमारांना हे काय झालंय? त्यांची मानसिक स्थिती आता अतिशय दयनीय झाली आहे, किंवा नितीश बाबू १०० टक्के संघी बनले आहेत, अशी बोचरी टीका राजद पक्षाने केली आहे. तर, काँग्रेसनेही या व्हायरल व्हिडिओवरुन संताप व्यक्त करत, हे कृत्य माफी योग्य नाही असे म्हटलं आहे.
