शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात आणखी दोन विमातळ हवेत यासाठी थेट केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. नागरि उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्रात आणखी दोन विमानतळ असले पाहिजेत या आशयाचं पत्र आदित्य ठाकरेंनी लिहिलं आहे. त्यामुळे आता ज्योतिरादित्य शिंदे हे या पत्राला काही उत्तर किंवा प्रतिसाद देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
काय म्हटलंय आदित्य ठाकरेंनी पत्रात?
ज्योतिरादित्यजी, मी आपणास विनंतीपूर्वक हे पत्र लिहित आहे की मागच्या महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात ५० नवे विमानतळ बांधले जातील असंही त्यांनी सांगितलं. मला हा निर्णय ऐकून खूपच आनंद झाला. मी तुम्हाला विनंती करतो आहे की महाराष्ट्राला आणखी दोन विमानतळांची आवश्यकता आहे. त्यामुळेच मी आपल्याला हे पत्र लिहितो आहे.
मुंबईत हवा तिसरा विमानतळ
मुंबईतत तिसरा विमानतळ हवा आहे. पुढच्या दहा वर्षांमद्ये ही गरज भासणार आहे. नवी मुंबईतला विमानतळ हा लवकरच पूर्ण होईल. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच आम्ही ही मागणी केली होती की मुंबईतला तिसरा विमानतळ हा पालघरमध्ये असावा. मुंबईचं शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणावर झालं आहे. तसंच पालघर हा औद्योगिक कंपन्यांचा मोठा भाग असलेला जिल्हा आहे. त्यामुळे या ठिकाणी विमानतळ उभारलं जाणं हे इंडस्ट्रीज आणि लोकांच्या दृष्टीने योग्य असणार आहे असं आदित्य ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.
दुसऱ्या विमानतळाची मागणी कुठे?
फरदापूर या ठिकाणी दुसऱ्या विमातळाची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. दुसरा विमानतळ या ठिकाणी असावा कारण ही जागा अजिंठा लेण्यांपासून अगदीच जवळ आहे. रोज अजिंठा लेण्यांना भेट देण्यासाठी हजारो पर्यटक जगभरातून येत असतात. या ठिकाणी जर विमानतळ झाला तर या ठिकाणच्या पर्यटनाला आणखी चालना मिळेल असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. सध्या औरंगाबाद या ठिकाणी एक विमानतळ आहे. मात्र तिथून अजिंठा लेणींचं अंतर १६० किमी आहे. इतक्या लांब पर्यटकांना यावं लागतं आहे. त्यामुळे जर अजिंठा लेणी असलेल्या भागात विमानतळ बांधला गेला तर पर्यटनाला चालना मिळेल असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.