कराड : माजी उपपंतप्रधान (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या समाधीला प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील यांनी प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रशासनावरील नाराजीनंतर अधिकाऱ्यांनी आदरांजली अर्पण केल्याने हा योगायोग चर्चेत राहिला आहे.

ज्येष्ठ्नेते यशवंतराव चव्हाण यांचा ४१ वा स्मृतिदिन असल्याने सकाळच्या प्रहरी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजीमंत्री बाळासाहेब पाटील यांनी चव्हाणांच्या समाधीला श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी त्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचे जाणवले. यावर सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, आणि या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार असून, पत्रही लिहिणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. मुख्यमंत्री  वा अन्य मंत्री आज काही कारणास्तव अनुपस्थित असतीलही पण, वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा पाळण्यास प्रशासन बांधील असल्याचे खडे बोल खासदार सुळे यांनी प्रशासनास बजावले होते.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या नाराजीनंतर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच एकत्रितपणे यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला श्रद्धांजली अर्पण केली. तर, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी कधी अशी एकत्रितपणे श्रद्धांजली वाहिली नसल्याने याची अनेक अंगाने चर्चा होत आहे.

प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या समवेत तहसीलदार कल्पना ढवळे,  कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मलकापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी कपिल जगताप, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार आदींची उपस्थिती होती.

या वेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वशैलीचा, दूरदृष्टीचा आणि ग्रामीण विकासासाठीच्या कार्याचा विशेष उल्लेख केला व यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील आदर्श नेते असल्याचे गौरवोद्गारही काढले.

फोटो ओळी : कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला श्रद्धांजली वाहताना, प्रातांधिकारी अतुल म्हेत्रे व अन्य अधिकारी.