महाराष्ट्राची शिखरस्वामिनी कळसुबाई आणि दुर्गराज हरिश्चंद्रगड ही नगर जिल्हय़ातील दोन्ही पर्वतशिखरे लवकरच विजेच्या प्रकाशाने उजळून निघणार आहेत. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून या शिखरांच्या विद्युतीकरणास नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. कळसुबाई हे सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर. १ हजार ६१६ मीटर उंचीच्या या शिखराच्या माथ्यावर कळसुबाईचे छोटेखानी मंदिर आहे. परिसरातील आदिवासींची ही देवी श्रद्धास्थान आहे. वर्षभर भाविकांची येथे वर्दळ असते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत भक्तांच्या गर्दीने कळसुबाईचे शिखर फुलून जाते. शिखराची वाट अवघड नसली तरी दमछाक करणारी आहे. वाटेवर जागोजागी पायऱ्या करण्यात आल्या असून, काही ठिकाणी लोखंडी शिडय़ाही लावल्या आहेत. माथ्यावर पोहोचल्यानंतर तेथून दिसणारे सृष्टिवैभव पाहून चित्तवृत्ती प्रसन्न होतात. वर्षभर गिरिप्रेमींना हे शिखर साद घालत असते. शिखराच्या पायथ्याशी देवीचे एक मंदिर आहे.
प्राचीन इतिहासाचा समृद्ध वारसा असणाऱ्या हरिश्चंद्रगडाला निसर्गप्रेमींच्या जीवनात आगळेवेगळे स्थान आहे. उंचच उंच पर्वतरांगा, त्यावरची डोंगरशिखरे, दोनअडीच हजार फूट उभा तुटलेला अंतर्वक्र कोकणकडा, संपन्न वन्यजीवन, प्राचीन कलेचा वारसा जोपासणारी लेणी, मंदिरे या सर्वामुळे या गडाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. योगी चांगदेवांनी आपल्या शिष्यांसह वर्षभर या गडावर वास्तव्य केले होते. त्याच काळात त्यांनी येथे ‘तत्त्वसार’ या ग्रंथाची रचना केली. गडावर अप्रतिम शिल्पकलेचा नमुना असलेले हरिश्चंद्रश्वराचे मंदिर आहे. परिसरातील भाविकांचे हे श्रद्धास्थान असून महाशिवरात्रीला गडावर मोठी यात्रा भरते. या गडावर वर्षभर दुर्गप्रेमींची ये-जा असते. अनेक पर्यटक गडावर असणाऱ्या गुहांमध्ये मुक्काम करतात.
या दोन्ही पर्वतशिखरांवर वीज नेण्याची परिसरातील नागरिकांची मागणी होती. अकोले तालुक्यातील १० कोटी रुपयांच्या पर्यटनविषयक कामांना राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. त्यात या दोन्ही गडांच्या विद्युतीकरणाच्या कामाचा समावेश आहे. १ कोटी ६० लाख रुपये खर्च करून कळसुबाई शिखरावर वीज नेण्यात येणार आहे. तसेच येथे ७६ लाख रुपये खर्च करून भक्तनिवासही उभारण्यात येणार आहे. हरिश्चंद्रगडाच्या विद्युतीकरणासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे लवकरच हे दोन्ही गड प्रकाशाने उजळून निघणार आहेत. गडावर वीज नेण्याच्या निर्णयाचे भाविक तसेच स्थानिक नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असले तरी पर्यावरणवाद्यांना ही बाब कितपत रुचेल याबद्दल साशंकता आहे.