अहिल्यानगर:यापूर्वी मुदत संपलेल्या ९९ व यंदाच्या वर्षात मुदत संपणाऱ्या ७६७ अशा एकूण ८६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे आदेश राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने काढले आहेत. त्यानुसार आता जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या ग्रामपंचायतींची मुदत संपेल तसतसे प्रशासक नियुक्त करावे लागणार आहेत.
राज्यात अशा प्रकारे मुदत संपणाऱ्या सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करावे लागणार आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने प्रशासक राज येणार आहे. त्यामध्ये नाशिक विभागातील २ हजार ४७६ ग्रामपंचायत, अमरावती विभागातील २ हजार ४५१, नागपूर विभागातील १ हजार ५०८, कोकण विभागातील ७९८, पुणे विभागातील २ हजार ८७० व छत्रपती संभाजीनगर विभागातील ४ हजार १३४ ग्रामपंचायतीचा समावेश आहे तेथे प्रशासक राज येणार आहे.
राज्यातील बारा जिल्हा परिषदा व त्यातील १२५ पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असला तरी उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने न्यायालयीन खटल्यातून प्रलंबित राहिलेल्या आहेत. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचाही समावेश आहे. या निवडणुका झाल्याशिवाय मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे शक्य नाही. त्याची मतदार यादी, प्रारूप प्रभाग रचना, आरक्षण असे अनेक टप्पे खोळंबलेले आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी दिवाळीपर्यंतचा कालावधी उजाडेल असा अंदाज प्रशासनातून व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे शक्य नसल्याने मुदत संपलेल्या व वर्षभरात संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्यावर्षी मुदत संपलेल्या ९९ तर येत्या वर्षभरात मुदत संपलेला ७६७ ग्रामपंचायती आहेत. येत्या वर्षभरात जसजशा ग्रामपंचायतींची मुदत संपेल, तसतसे त्यावर प्रशासक नियुक्त होतील. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी नगरपालिका व महापालिकांवरही दीर्घकाळ प्रशासक राज होते. नुकत्याच निवडणुका होऊन नगरपालिकांमधून लोकप्रतिनिधींच्या अस्तित्व निर्माण झाले. महापालिकांच्या निवडणुका झाल्या, मात्र पदाधिकारी निवडीच्या सभा अद्याप बाकी असल्याने तेथील लोकप्रतिनिधींचे अस्तित्व, निवडून येऊनही काही दिवसांसाठी प्रलंबित राहिले आहे. आता ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त होणार आहेत.
प्रशासक राजची संख्या
अहिल्यानगर जिल्ह्यात प्रशासक राज येणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे- अकोले ५२, संगमनेर ९४, कोपरगाव २९, राहाता २५, श्रीरामपूर २७, राहुरी ४४, नेवासा ५९, पाथर्डी ७८, शेवगाव ४८, कर्जत ५६, जामखेड ४७, पारनेर ८८, श्रीगोंदे ५९. अशा एकूण ७६७ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त होईल.

