शिक्षण हक्क कायद्यानुसार घेण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळून आल्याने सोलापुरात लिटल फ्लॉव्हर कॉन्व्हेन्ट स्कूलची प्रवेश प्रक्रिया सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाने रद्द केली आहे. तर, सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये कायद्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याची तक्रार पालकांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे केली आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आवाहन पालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने दिले असता त्याकडे डोळेझाक करून लिटल फ्लॉव्हर स्कूलने नेहमीप्रमाणे आपल्या मर्जीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे पालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी या शाळेची प्रवेश प्रक्रिया तपासली असता त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने या शाळेची प्रवेश प्रक्रिया ‘सील’ केली होती. परंतु त्यानंतरदेखील लिटल फ्लॉव्हर स्कूलने ताठरपणा कायम ठेवला. एवढेच नव्हे तर पालिका शिक्षण मंडळाशी कसलाही संवाद साधला नाही. तसेच तपासणी करण्यासाठी आलेल्या पालिका शिक्षण मंडळाच्या पर्यवेक्षकाला वाईट व अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे अखेर या शाळेची प्रवेश प्रक्रियाच रद्द करण्यात आल्याचे शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये प्रवेश देताना शिक्षण हक्क कायदा धाब्यावर बसविण्यात आल्याची तक्रार पालकांनी केली  आहे. पालकांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त गुडेवार यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. तर, सेंट जोसेफ स्कूलचे प्राचार्य फादर सायमन डिसोझा यांनी मात्र प्रवेश प्रक्रिया कायद्याचे उल्लंघन झाल्याच्या आरोपाचा इन्कार केला. कायद्यानुसार १२० मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. आणखी प्रवेश मर्यादा वाढवून दिली तर प्रश्न सुटू शकेल, असे त्यांचे म्हणणे आहे. तर ‘सेंट जोसेफ’चे प्राचार्य व पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन हे दोघे अंतिम जागा निश्चित करतील. यात सुमारे ६० जागा वाढण्याची शक्यता शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी कांबळे यांनी व्यक्त केली आहे.