scorecardresearch

VIDEO: “स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबईही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू आणि…”, शरद पवारांचं नाव घेत सदावर्तेंचं मोठं वक्तव्य

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केवळ स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबईही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू असं मोठं वक्तव्य केलं आहे.

Sharad Pawar Gunratna Sadavarte
शरद पवार व गुणरत्न सदावर्ते

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केवळ स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबईही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू असं वक्तव्य केलं आहे. तसेच पवार, चव्हाण आणि देशमुख अशी तीन कुटुंबं मराठवाड्याचे मारेकरी असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध नेते असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली. ते शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) उस्मानाबादमध्ये स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीच्या मागणीसाठी आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.

गुणरत्न सदावर्ते, “एवढे लालची आणि स्वार्थी राजकारणी मी पाहिले नाही. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांनी शिप्टा नावाची एकमेव कंपनी या भागात आणली. त्या तुप्पा भागातील कष्टकरी त्यांना मतदान देण्यासाठी उत्सुक नव्हते. त्यावेळी वेगळ्या पक्षाची कामगार चळवळ होती. म्हणून ती शिप्टा कंपनीही बंद पाडण्यात आली.”

“चव्हाण आदर्शच्या आणि देशमुख साणंदाच्या बाहेर जाऊ शकले नाही”

“पाणी आणि सिंचनाबाबतही शंकररावांच्या काळात तेच झालं. अशोक चव्हाणांच्या काळात तर ते आदर्शच्या बाहेर जाऊ शकले नाहीत. विलासराव देशमुखांच्या काळात ते साणंदाच्या बाहेर जाऊ शकले नाही. याचं कारण राज्य मोठं होतं हे होतं. वेगवेगळ्या ठिकाणच्या आमदारांची गणती केली जायची. विदर्भातील काही जिल्हे, मराठवाड्यातील जिल्हे यांची बेरीज करून गलिच्छ राजकारण केलं जात होतं,” असा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला.

“पवार, चव्हाण आणि देशमुख अशी तीन कुटुंबं मराठवाड्याचे मारेकरी”

“सामान्य लोकांना आवाज नव्हता. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध नेते शरद पवार व कुटुंब, शंकरराव चव्हाण व कुटुंब आणि विलासराव देशमुख व कुटुंब हेच मराठवाड्याचे मारेकरी आहेत. म्हणून आम्ही खनिजाच्या सर्वंकष अभ्यासानंतर मराठवाडा स्वतंत्र राज्य झालं पाहिजे ही मागणी घेऊन पुढे आलो आहोत,” असंही सदावर्तेंनी नमूद केलं.

व्हिडीओ पाहा :

मुंबई वेगळी का हवी? गुणरत्न सदावर्ते म्हणाले…

मुंबई वेगळी का हवी? या प्रश्नावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “ज्याप्रमाणे पंजाबची राजधानी चंदीगड केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचप्रमाणे मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश केलं पाहिजे. मुंबई २४x७ सुरू ठेवायची असेल, तिचं स्वतंत्र्य आबाधित ठेवायचं असेल, जगाची आर्थिक राजधानी ठेवायची असेल तर मुंबई केंद्रशासित प्रदेश झाली पाहिजे.”

“माझ्या मागणीला ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी आणेंचाही पाठिंबा”

“मुंबई स्वतंत्र राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश करण्याच्या माझ्या मागणीला फेसबुकवर ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी आणे यांनीही पाठिंबा दिला आहे,” असंही सदावर्तेंनी नमूद केलं.

“छोटी राज्ये मानवी विकासाचं केंद्र होऊ शकतात”

ते पुढे म्हणाले, “छोटी राज्ये मानवी विकासाचं केंद्र होऊ शकतात. तिथं जलदगतीने विकास होऊ शकतो. एका ठिकाणी न्युरोसर्जन उपचार करतोय आणि गडचिरोलीला एखादा व्यक्ती पडला तर न्युरोसर्जन नसल्याने त्याचा मृत्यू होतोय. इथल्या पोलीस अधीक्षकांनी ऐकलं नाही, तर पोलीस महासंचालक मुंबईला असतात. तिकडे कोण जाणार? पोलीस महासंचालक इथल्या इथं मराठवाड्यात असतील तर त्यांच्यापर्यंत पोहचणं सोपं जाईल.”

हेही वाचा : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर शरद पवारांनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले, “फडणवीसांनी मागे…”

“जशी तेलंगाणाने प्रत्येक जिल्ह्यात मंत्रिमंडळ बैठक ठेवली तशी बैठक छोटे राज्य झाल्यावर होईल. मराठा, धनगर, बौद्ध म्हणून नाही तर कष्टकरी म्हणून हा स्वतंत्र मराठवाड्याचा लढा आहे,” असं सदावर्ते यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 11:14 IST
ताज्या बातम्या