रत्नागिरी  : वाढत्या तापमानाचा परिणाम कोकणातील सागरी कासवांच्या जन्मदरावर होत असून जन्मणारी पिल्ले अशक्त असल्याचेही संशोधनातून पुढे आले आहे. कोकण किनारपट्टीवर दरवर्षी ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या अंडी घालतात. पूर्वी नोव्हेंबर ते डिसेंबर या थंडीच्या महिन्यात सागरी कासवांची घरटी सापडत होती. गेल्या काही वर्षांमध्ये ही घरटी उन्हाळी महिन्यांमध्ये दिसू लागली आहेत. या बदलांबरोबरच कासवांच्या विणीवर तापमानाचा होणारा परिणाम तपासण्यासाठी अभ्यास प्रकल्प वन विभागाच्या ‘मँग्रोव्ह फाउंडेशन’च्या माध्यमातून हाती घेण्यात आला. भारतीय वन्यजीव संस्थानचे वरिष्ठ संशोधक डॉ. के. शिवाकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक सुमेधा कोरगावकर यांनी अभ्यास केला. तीन वर्षे केलेल्या अहवालातून कासवांचा विणीवर तापमान बदलाचा गंभीर परिणाम होत असल्याचे पुढे आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दिवेआगर, केळशी, आंजर्ले, कोळथरे, दाभोळ, गावखडी, माडबन (जि. रत्नागिरी), वायंगणी (जि. सिंधुदुर्ग) हे किनारे या संशोधनासाठी निवडण्यात आले होते.  कासवांच्या पिल्लांचे लिंग विकसित होण्यासाठी घरटय़ातील तापमान महत्त्वाचे असते. साधारणपणे २९.५ अंश सेल्सिअस तापमानामुळे अंडय़ांमध्ये समानरीत्या नर आणि मादीचे लिंग विकसित होते. ३३ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान अंडय़ांच्या विकासाकरिता सुरक्षितही असते. संशोधनासाठी वापरलेल्या ’डेटा लॉगर’मुळे कासवांच्या घरटय़ातील तापमान ३६ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढत असल्याचे उघडकीस आले. वाढत्या तापमानामुळे पिल्ले कमी संख्येने मिळतात. तसेच अशक्त असल्यामुळे त्यांच्या हालचालीही मंद असतात. काही अंडय़ांमध्ये पिल्ले मृत पावलेली असतात. घरटय़ाच्या आतील तापमान ३३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाले तर मादी पिल्लांची संख्या वाढत असल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. बऱ्याच वेळा लाटांच्या पाण्याबरोबर वाहून येणाऱ्या गाळाचे कण वाळूमध्ये मिसळतात आणि घरटय़ातील आद्र्रता, अधिक तापमानामुळे ते दगडासारखी कडक होतात. त्यात अडकल्यानेही कासवांची पिल्ले मरण पावतात.

या पार्श्वभूमीवर कासव संवर्धनात पिल्लांचा जन्मदर वाढविण्यासाठी तापमान संतुलनाचे आव्हान कासवमित्रांपुढे निर्माण झाले आहे. गावखडीत कासवमित्र प्रदीप डिंगणकर यांनी केलेल्या प्रयोगानुसार मादी कासव अंडी घालून गेल्यानंतर ती सुरुच्या वनामध्ये किंवा घरटय़ातील तापमान संतुलित असलेल्या ठिकाणी स्थलांतरित केली तर पिल्लांचा जन्मदर वाढू शकतो, असे आढळून आले आहे.

घरटय़ामधील वाढते तापमान आणि आद्र्रता लाल रंगाच्या (डोरिलस ओरिएंटलिस) मुंग्यांसाठी पोषक असते. या मुंग्या कासवांच्या पिल्लांना आणि परिपक्व अंडय़ांना खातात, असे कोळथरे आणि वायंगणी (वेंगुर्ला) येथील घरटय़ांच्या तपासणीतून पुढे आले. मुंग्यांचे हल्ले कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या बियांची पावडर घरटय़ांच्या बाजूने खोदून पेरण्यात आल्या. त्यामुळे मुंग्यांचा प्रभाव कमी झाला आणि घरटय़ांचे रक्षण झाले.

कासवांच्या विणीवर तापमानवाढीचा होणारा परिणाम लक्षात आला असून अभ्यासात सुचवलेल्या उपायांची अंमलबजावणीसाठी आवश्यक निकष तयार केले जातील. तसेच संबंधितांना प्रशिक्षणही दिले जाईल. तर ’डेटा लॉगर’चा वापर करून घरटय़ांमधील तापमानाचे बदल समजून घेणे आणि जन्मदर वाढवण्याकरिता दीर्घकालीन माहिती संकलित करण्याची योजना आखणार आहोत.

–  वीरेंद्र तिवारी, कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक

Story img Loader