Dawood Ibrahim Property : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या रत्नागिरी येथील वडिलोपार्जित जमिनीचा व्यवहार झाला आहे. दोन जणांनी दाऊदशी संबंधित जमीन विकत घेतली आहे. या जमिनींचा लिलाव वारंवार करण्यात आला होता. पण या जमिनीची खरेदी करण्यासाठी कुणीही तयार नव्हतं. आता अखेर दाऊदची वडिलोपार्जित जमीन विकली जाणार आहे. केंद्र सरकारने हा लिलाव आयोजित केला होता.

५ मार्च २०२६ ला काय घडलं?

५ मार्च २०२६ ला केंद्र सरकारने दाऊदच्या रत्नागिरी तालुक्यातील खेड येथील मुम्बके गावात असलेल्या जमिनीचा लिलाव आयोजित केला होता. चार भूखंडांसाठी हा लिलाव आयोजित करण्यात आला होता. हे भूखंड कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमच्या कुटुंबाचे आहेत. त्याची आई अमीना बी च्या नावे हे भूखंड होते. या लिलावात मुंबईच्या एका व्यक्तीने चारपैकी एक भूखंड खरेदी केला. तर आणखी एका व्यक्तीने तीन भूखंड सर्वाधिक बोली लावून विकत घेतले. या दोन्ही ग्राहकांची ओळख सरकारतर्फे गोपनीय ठेवण्यात आली आहे. दाऊद इब्राहीम हा भारतातील कुख्यात गँगस्टर आहे. तो ९० च्या दशकातच दुबईला पळाला आहे. सध्या तो कराचीमध्ये आहे अशी माहितीही समोर आली होती. दरम्यान त्याच्या मालमत्तांचा लिलाव केंद्र सरकारने केला आहे.

SAFEMA कायद्यानुसार कारवाई

केंद्र सरकारने स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स फॉरफीचर ऑफ प्रॉपर्टी कायदा अर्थात (SAFEMA ) च्या अंतर्गत हे भूखंड जप्त केले होते. ही कारवाई अशा गुन्हेगारांच्या विरोधात होते ज्यांचा संबंध अपराध किंवा तस्करी यांच्याशी जोडलेला असोत. २०१७, २०२०, २०२४ आणि २०२५ अशा वर्षांमध्ये एकूण चारदा या जमिनींचा लिलाव जाहीर करण्यात आला होता. पण कुणीही बोली लावण्यासाठी आलं नाही. त्यामुळे हे भूखंड कोण विकत घेणार असा पेच निर्माण झाला होता. आता मात्र हे चारही भूखंड विकण्यात आले आहेत. NDTV ने हे वृत्त दिलं आहे.

दाऊदच्या भूखंडांसाठी किती बोली लागली?

दाऊदच्या भूखंडांसाठी वेगवेगळ्या किंमती ठरवण्यात आल्या होत्या. मुख्य भूखंडाची किंमत ९ लाख ४१ हजार ठरवण्यात आली होती. हा भूखंड १० लाखांहून अधिक किंमतीला विकला गेला. ज्यांनी लिलावात ही बोली लावून जमीन विकत घेतली आहे त्यांना एप्रिल २०२६ पर्यंत संपूर्ण रक्कम जमा करावी लागणार आहे. त्यानंतरच हा व्यवहार कायदेशीर मानला जाईल. दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव केंद्र सरकारतर्फे करण्यात आला आहे. दाऊद पळून गेल्यानंतर हे भूखंड जप्त करण्यात आले होते.