एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी काल औरंगाबादमध्ये असताना औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले, यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज बोलता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ठाकरे सरकारमध्ये हनुमान चालीसा म्हटली तर कारवाई आहे. परंतु काश्मीर तोडण्याचा नारा देणाऱ्यांवर कारवाई नाही. शर्जीलवर कारवाई नाही आणि अकबरुद्दीन ओवेसींना मी सांगू इच्छितो, औरंगजेबाच्या कबरीचा त्या ठिकाणी महिमामंडन करून, तुम्ही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या देशभक्त मुस्लिमांचा अपमान केला आहे.”

तसेच, “औरंगजेब या देशात हिंदूंचा तर नाहीच पण मुस्लिमांचाही नेता होवू शकत नाही. कारण, या देशावर त्याने आक्रमण केलं होतं आणि ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची छळ करून हत्या केली, अशा औरंगजेबाचं महिमामंडन आम्ही मान्य करणार नाही. त्यामुळे अशाप्रकारे जर त्याचं कोणी महिमामंडन करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.” असंही फडणवीसांनी सांगितलं.

याचबरोबर, “छोट्या-छोट्या गोष्टींवर कारवाई करणारे, लीलावतीतील एखादा फोटो ट्वीट झाला तर त्यावर कारवाई करणारे आता का गप्प आहेत? हा माझा सवाल आहे. त्यांनी कारवाई केली नाही तरी आम्ही हे सहन करणार नाही, याची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही.” असा इशाराही फडणवीसांनी यावेळी दिला.

तर, मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाल्यानंतर २४ तासांच्या आत या सभेच्या पार्श्वभूमीवर कारवाई केली गेली. मात्र, ओवेसींच्या सभेनंतर अद्यापपर्यंत काहीच कारवाई झालेली नाही यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी “उद्धव ठाकरे ज्या लोकांसोबत बसले आहेत, त्यांचीच नीती ते चालवत आहेत.” असं म्हणत टोला लगावला.