पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कल्याण आणि नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली. तसेच मुंबईत त्यांचा रोडशोदेखील आयोजित करण्यात आला. मात्र नाशिक किंवा कल्याणची सभा असो किंवा मुंबईतील रोडशो असो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुठेही दिसून आले नाही. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या अनुपस्थितबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन झाले असून ते उद्यापासून पुन्हा प्रचारात दिसू लागतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

काय म्हणाले उमेश पाटील?

“अजित पवार नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत, अशा बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. पण ते नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत. अजित पवार यांना निवडणुकीच्या कार्यकाळात घशाचे इन्फेक्शन झाले होते, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितली आहे. मात्र ते उद्यापासून पुन्हा प्रचारात सहभागी होतील”, अशी प्रतिक्रिया उमेश पाटील यांनी दिली.

हेही वाचा – “शरद पवार अजित पवारांची ‘ती’ इच्छा पूर्ण करणार होते” ; जयंत पाटलांचं विधान

काँग्रेसच्या आरोपालाही दिलं प्रत्युत्तर

अजित पवार यांना जाणीवपूर्वक प्रचारापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. या आरोपालाही उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. “काँग्रेसने केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहे. यात काहीही तथ्य नाही. अजित पवार यांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये, वॉर्डात, तालुका, जिल्ह्यात आहेत. मतदारांचा मोठा वर्ग त्यांच्या पाठिशी आहे. पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजुला ठेवून कोण स्वतः चे नुकसान करुन घेईल का?” असे उमेश पाटील म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावरही दिली प्रतिक्रिया

या निवडणुकीत अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. या दाव्यावर बोलताना, “अजित पवार यांच्या पक्षाला जागा मिळणार की नाही, हे मतदार ठरवतील. ४ जूनला त्याचे निकाल येईल. अजित पवार यांच्या पाठीशी ४०-५० आमदार आहेत. पण पृथ्वीराज चव्हाणांबरोबर एकही आमदार नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे भाष्य माध्यमांनी किती गांभीर्याने घ्यावे याचादेखील विचार करावा”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“राज्यात निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे अशी दावे करून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पृथ्वीराज चव्हाण फक्त राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना टीव्हीवर टीआरपी मिळतो. पण त्यांना राज्यासंदर्भात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राजकारणावर भाष्य करावे, एवढी उंचीही त्यांची नाही. ज्या विधानसभेत ते नेतृत्व करतात त्यांना त्यांच्याकडे स्वतःची ग्रामपंचायतदेखील नाही हे केवढे मोठे दुर्दैव आहे”, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली.

हेही वाचा – बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचाराला अनुपस्थित; शरद पवार काळजी व्यक्त करत म्हणाले, “ते…”

संजय राऊतांच्या आरोपावरही केलं भाष्य

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेल्या बॅगांमध्ये पैसे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता, या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “माझी गाडी तपासली तरी माझ्या गाडीत ३-४ बॅगा सापडतील. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता राज्यात प्रचारासाठी फिरत असताना एवढे साहित्य ठेवतो. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री दौरा करणार त्यावेळी त्यांचे साहित्य बरोबर असणारच आहे. त्यात एवढे गहजब करण्याची काय आवश्यकता नाही”, असे ते म्हणाले.