राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज फेसबुकवरुन जनतेशी संवाद साधला. करोनामुळे महाराष्ट्रात, देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेली परिस्थिती मांडताना महाराष्ट्रात स्थिती बदलण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपले विचार मांडले. या फेसबुक संवाद कार्यक्रमात राज्याच्या वेगवेगळया भागातून नागरिक आपले प्रश्न शरद पवार यांना विचारतात.

उस्मानाबादमधील एका पैलवानाने जत्रेसंबंधीचा प्रश्न मांडला. एप्रिल-मे या काळात राज्याच्या ग्रामीण भागात जत्रा भरतात. यंदा करोनाच्या संकटामुळे सर्व जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत. अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासंबंधी प्रश्न विचारला.

जत्रा रद्द झाल्यामुळे वर्षभराची कमाई बुडली आहे. शासनाकडून काही मदत मिळू शकते का? असा प्रश्न या पैलवानाने विचारला होता. त्यावर “जत्रा बंद झाल्या ही गोष्ट खरी आहे. पैलवानांसाठी कुस्तीचं मैदान असतं. त्याप्रमाणे कलाकारांसाठी सांस्कृतिक मंच असतो. ते कार्यक्रम सुद्धा बंद आहेत. अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे” असे शरद पवार म्हणाले.

“महाराष्ट्रात कुस्ती संघटनेचा मी अध्यक्ष आहे. करोनाचं हे संकट संपल की, विविध संस्थांच्या माध्यमातून कुस्तीचे सामने आयोजित करण्याचा विचार आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये कुस्तीसंबंधी आस्था आहे. या आस्था असलेल्या लोकांना एकत्र करुन कुस्ती सामने आयोजित करण्याचा प्रयत्न करु” असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.

आणखी वाचा- पालघर घटनेवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

नियम पाळल्यास सुधारणा होईल
संपूर्ण जगामध्ये करोनाने थैमान घातले आहे. अमेरिका आरोग्य सुविधांच्या बाबतीत उत्तम सुविधा असलेला देश आहे. पण तिथे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या ४० हजारच्या घरात आहे. देशपातळीवर विचार करता महाराष्ट्रात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जास्त आहे. नियम पाळल्यास सुधारणा होईल. मृत्यूचा आकडा शून्यावर आणण्याच्या दृष्टीने काम केले पाहिजे.

आणखी वाचा- रमझानच्या महिन्यात घरातच नमाज पठण करा; शरद पवारांचं आवाहन

मुंबई, पुण्यात नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करा
मुंबई, पुण्यात लॉकडाउनच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करा. लॉकडाउनमुळे देश आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत स्थिती बरी पण समाधानकारक नाही. सध्याच्या परिस्थितीत नकारात्मकता कमी करणं आवश्यक आहे. पालघरवरुन कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र निर्माण केलं जातय.