महाविकास आघाडीच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, मनसे आणि इतर छोट्या छोट्या पक्षांना बरोबर घेऊन महायुतीच्या वज्रमुठीची ताकद दाखविली. मात्र निवडणूक पूर्ण होताच ही महायुतीची मूठ सैल झाल्याचे दिसत आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महायुतीने एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. मनसेने याची सुरुवात करत कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीशी चर्चा न करता अभिनेते अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी जाहीर केली. आता भाजपानेही आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत.

विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी भाजपाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानुसार, मुंबई पदवीधर मतदासंघासाठी भाजपाकडून किरण शेलार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाने तीनही उमेदवार जाहीर केल्यानंतर महायुतीमध्येच आता चुरस वाढल्याचे दिसत आहे. ही आगामी विधानसभा निवणुकीची नांदी आहे का? अशीही चर्चा होत आहे.

पदवीधर निवडणुकीवरून मनसे भाजपात जुंपली? अभिजीत पानसे म्हणाले, “तुम्ही १२ वर्षांत…”

शिवसेना शिंदे गटही निवडणुकीच्या रिंगणात

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपा विरुद्ध मनसे असे चित्र दिसत असतानाच शिवसेना शिंदे गटानेही या निवडणुकीत उडी घेतली आहे. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूकीकरिता कोकण भवन येथून उमेदवारी अर्ज घेतला आहे. यामुळे शिवसेनेकडूनही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल, असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

बिनशर्त पाठिंब्यानंतर मनसेकडून उमेदवार जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह यांच्यासह काही सभा घेतल्या. लोकसभा निवडणुकीत मनसेच्या वाट्याला एकही जागा आली नाही. दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवार उभा करावा, असा प्रस्ताव दिला गेला होता, असा खुलासा खुद्द राज ठाकरे यांनी एका सभेत केला. मात्र मनसे सोडून इतर चिन्हावर उमेदवार उभा करणार नाही, अशी थेट भूमिका त्यांनी मांडली होती. लोकसभेत पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेत आपले उमेदवार महायुतीद्वारे उभे करू, असेही त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे विधानपरिषदेत त्यांनी अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला.

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांतील निवडणूक कधी?

विधान परिषदेच्या चार जागांसाठी एप्रिल महिन्यात कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार १५ जूनला मतदान होणार होते. पण शाळांना सुट्टी असल्याने मतदानाची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी विविध राजकीय पक्ष तसेच शिक्षकांच्या संघटनांकडून करण्यात आली होती. दोन आठवड्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आलेल्या निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणूक लांबणीवर टाकली होती. आता नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला. यानुसार २६ जूनला मतदान होईल. मतमोजणी १ जुलैला करण्यात येणार आहे. ३१ मे ते ७ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.