BJP Blames Shinde Shiv Sena: विधान परिषदेच्या पाच जागांवर झालेल्या निवडणुकीत महायुतीचा दोन शिक्षक मतदारसंघात तर महाविकास आघाडीचा तीन पदवीधर मतदारसंघात विजय झाला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा झालेला पराभव हा भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला असून मुख्यमंत्री फडणवीस यांना काँग्रेसबाबत केलेली सोशल मीडिया पोस्ट डिलीट करावी लागली. यानंतर आता भाजपाने पराभवाचे खापर महायुतीच्या मित्रपक्षांवर आणि विशेषतः शिवसेनेवर (शिंदे) फोडले आहे. भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन आणि केशव उपाध्ये यांनी यावरून जोरदार टीका केली आहे.
विधानपरिषदेच्या पुणे आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल हा प्राथमिक फेऱ्यानंतरच स्पष्ट झाला होता. मात्र नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या सुधाकर कोहळेंचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र तिसऱ्या क्रमाकांवर असलेल्या कराळे मास्तरांना मिळालेली दुसऱ्या पसंतीची मते मोजल्यानंतर काँग्रेसच्या अभिजीत वंजारींचा विजय झाला. या विजयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसला उद्देशून केलेली शून्य जागांची पोस्ट डिलीट करावी लागली आणि त्यानंतर भाजपाने शिवसेनेच्या (शिंदे) विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसले.
भाजपाचे प्रवक्ते आणि नगरसेवक यांनी सोशल मीडियावर यासंबंधी सविस्तर पोस्ट लिहिली आहे. ते म्हणाले, “शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मते पदवीधर निवडणुकीत भाजपाला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला.”
‘शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले’
“शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही”, अशीही टीका त्यांनी केली.
भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनीही या प्रकरणावरून महायुतीमधील मित्रपक्षांचे कान टोचले आहेत. “पाच जागांच्या निकालानंतर तरी ‘महायुती’ म्हणून आत्मचिंतन करणार आहोत का? एकत्रित लढलो असतो तर पाचही जागा जिंकण्याची सहज शक्यता असताना दोन वर का थांबलो याचा विचार करणार आहोत का?”, असे प्रश्न उपस्थित करत उपाध्ये यांनी महायुतीला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला.
भाजपाला मतदान न करण्याचे धंगेकरांचे आवाहन
पुणे पदवीधर मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना जाहीर पाठिंबा दिला होता. तसेच पुण्यातील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या उमेदवार स्मिता जाधव यांना मतदान करू नये, अशी मोहीमच चालवली होती. धंगेकर यांनी सोशल मीडियावर ‘पदवीधरांनो स्मिता जाधवांना मतदान करू नका’ असे जाहीर आवाहनच केले होते.
एका जागेचा वाद काय?
पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांना पहिल्या पसंतीची १ लाख १२ हजार, तर भाजपच्या स्मिता जाधव यांना १ लाख ०२ हजार मते मिळाली. तर शिवसेना शिंदे गटाने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना १३,६४२ मते मिळाली. अपक्ष दत्तात्रय सावंत यांना १० हजार, तर काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर यांना ८६०० मते मिळाली आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात निवडणुकीपूर्वीच बेबनाव निर्माण झाला होता. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे यांना उमेदवार देण्यात आली होती. महायुतीत जागावाटपात सहमती झाल्यावर चिवटे यांना माघार घेण्यास सांगण्यात आले.
