scorecardresearch

सोलापूरमधल्या बार्शीत फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, दोन कामगारांचा भाजून मृत्यू तर सात कर्मचारी गंभीर जखमी

सोलापूरच्या बार्शी या ठिकाणी एका फटाका कंपनीत भीषण स्फोट झाला. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होते आहे

सोलापूरमधल्या बार्शीत फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, दोन कामगारांचा भाजून मृत्यू तर सात कर्मचारी गंभीर जखमी
After Nashik, big blast at cracker factory in Solapur's Barshi, Two Dead and several employees injured

एजाज हुसेन मुजावर, प्रतिनिधी, बार्शी
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत असलेल्या फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील ही घटना आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला. फटाका फॅक्टरीत ४० पेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते. या भीषण स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर सात कर्मचारी जखमी झाले आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिली.

नेमकी काय घडली घटना?
बार्शी तालुक्यातील शोभेच्या दारूची निर्मिती करणाऱ्या कारखान्यात अचनाक स्फोट झाला. या घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य सात कामगार गंभीर जखमी झाले आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होते आहे. ही घटना घडल्यानंतर साधारणतः तासाभराने पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचलं आणि त्यांनी मदत तसंच बचावकार्याला सुरूवात केली.

मराठवाडा सीमेवर असलेल्या पांगरी गावात आहे फटाका कारखाना

मराठवाडा सीमेवर असलेल्या पांगरी हे मोठे गाव असून तेथे स्वतंत्र पोलीस ठाणेही कार्यरत आहे. तेथून जवळच शिराळा गावच्या शिवारात माळरानावर शोभेच्या दारू निर्मितीचा कारखाना आहे. दुपारी या कारखान्यात नेहमीप्रमाणे कामगार काम करीत असताना अचानकपणे शोभेच्या दारूचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की आसपासच्या काही किलोमीटर अंतरावरचा परिसर हादरला. तेव्हा लगेचच स्थानिक तरूणांनी दुर्घटनाग्रस्त कारखान्याच्या दिशेने धाव घेतली. कारखान्यात एका पाठोपाठ एक शोभेच्या दारूचा स्फोट होत होता. कारखान्यातील कामगार या दुर्घटनेत सापडले आणि गंभीर भाजून जखमी झाले. काही कामगार गंभीर जखमी अवस्थेत जिवाच्या आकांताने स्वतः काही अंतरावर मोकळ्या मैदानावर येऊन पडले होते. शरीर भाजून काळे पडलेले हे कामगार असह्य वेदनांनी विव्हळत होते.

स्थानिक तरूणांनी घटनास्थळी पोहचून सुरू केलं बचावकार्य
स्थानिक तरूणांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पोलीस आणि अग्निशमन यंत्रणेला दुर्घटनेची माहिती कळविली. परंतु दोन्ही यंत्रणा तेथे पोहोचण्यास तासभर उशीर झाला. तोपर्यत स्थानिक तरूणांनी खासगी वाहनांतून जखमी कामगारांना नजीकच्या रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, मृत कामगारांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

बार्शी आणि परिसरात फटाक्यांचे कारखाने मोठ्या प्रमाणावर
बार्शी तसंच शेजारच्या मराठवाडा भागातील उस्मानाबाद, बीड भागात शोभेच्या दारूचे कारखाने मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. अधुनमधून या कारखान्यांमध्ये आगीची ठिणगी पडून शोभेच्या दारूचे स्फोट होतात आणि गरीब कामगारांचे हकनाक बळी जातात. कारखान्यात अशा आपत्कालीन जीवघेण्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अतिशय मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात. अग्निशमन यंत्रणा पुरेशा प्रमाणात तैनात नसते. त्याबाबत संबंधित कारखानदार आणि प्रशासकीय यंत्रणाही उदासीन असते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 17:27 IST

संबंधित बातम्या