अहिल्यानगर : नगर शहरातील श्री ऋषभ संभव श्वेतांबर संघ जैन मंदिर ट्रस्टची जागा बळकावत तेथे राजकीय कार्यालयात थाटल्याची तक्रार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी सहधर्मदाय आयुक्त यांच्याकडे करत पुण्यातील कार्यालयापुढे आज, बुधवारपासून धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. सहधर्मदाय आयुक्तांनी सखोल चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश नगरच्या धर्मदाय उपायुक्तांना दिले आहेत. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती काळे यांनी दिली.
शहर लोकप्रतिनिधी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, ट्रस्ट अध्यक्ष आणि अन्य विश्वस्तांनी संगनमत करून धर्म कार्याचा भूखंड हडप केल्याची तक्रार करत चौकशीच्या मागणीसाठी पुण्यात आंदोलनाला सुरुवात केली होती. आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त तैनात होता. यावेळी अहिल्यानगर सह पुण्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तत्पूर्वी काळे यांनी एचएनडी जैन बोर्डिंग येथे आचार्य गुरुदेव गुप्तिनंदीजी महाराज यांचे दर्शन घेतले. दुपारी माजी आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेनेचे उपनेते गजानन कुचिक, पुणे शहरप्रमुख संजय मोरे, शहरप्रमुख गजानन थारकुडे आदींनी भेट दिली. धंगेकर यांनी शिष्टाई करत आश्वासनाचे लेखी पत्र प्राप्त केल्यानंतर काळे यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे जाहीर केले.
देणगीदार मंगूबाई व्होरा यांनी भूखंड कुणालाही विकू नये, कोणत्याही कारणास देऊ नये, केवळ धर्म कार्यासाठी वापरावा, अशा अटी व शर्ती मृत्युपत्रात घातल्या असताना त्याचे उल्लंघन का केले गेले ?, राजकीय पक्षाचे कार्यालय तेथे कसे काय थाटले गेले ?, धर्मदाय कार्यालयाची पूर्वपरवानगी न घेता तथाकथित भाडेकरूला संपूर्ण भूखंड कसा काय दिला गेला ? भूखंड विक्रीची नोटीस कशी काय प्रसिद्ध करण्यात आली ? याची चौकशी याप्रकरणी होणार असल्याचे किरण काळे यांनी सांगितले.
