scorecardresearch

राज ठाकरेंच्या भाषणानंतर मशिदींवरील भोंग्यांच्या प्रकरणामध्ये अबू आझमींची उडी; म्हणाले “गणपती, नवरात्री, विवाह समारंभात…”

मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली असून त्याला भाजपाच्या नेत्यांनीही पाठिंबा दर्शवला असतानाच अबी आझमींचं हे वक्तव्य समोर आलंय.

abu azmi
राज ठाकरेंच्या भाषणावर दिली पहिली प्रतिक्रिया (फाइल फोटो सौजन्य सोशल मीडियावरुन साभार)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित मनसे मेळाव्यामध्ये आझानसाठी मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांवर आक्षेप घेतलाय. राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका मांडताना मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यांवर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी केली आहे. भाजपाच्या नेत्यांनीही राज ठाकरेंच्या या मागणीला सहमती दर्शविली आहे. असं असतानाच आता या मागणीवरुन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आझमी यांनी हिंदू सणांचा संदर्भ देत त्यावेळी वाजवण्यात येणाऱ्या डीजेमुळेही ध्वनिप्रदूषण होते असा मुद्दा उपस्थित केलाय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: सुप्रिया सुळेंनी करुन दिली २१०० कोटींच्या प्रकरणाची आठवण तर अजित पवार म्हणाले, “राज ठाकरे पलटी मारणारा…”

“मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषणाची तक्रार असेल, तर गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?”. असा सवाल अबू आझमी यांनी सोमवारी उपस्थित केला. पुढे बोलताना, “पण आम्ही कधी याबाबत तक्रार केली नसून केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर किंवा भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत,” असंही आझमी म्हणाले. त्याचप्रमाणे जनता राज ठाकरेंच्या या भूमिकेला थारा देणार नाही, असा विश्वसही आझमी यांनी व्यक्त केला.

नक्की वाचा >> “आव्हाडांना भोंगा, मशीद, मुस्लमान अशा गोष्टी ऐकायला आल्या की…”; मनसेचा जितेंद्र आव्हाडांना टोला

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढले नाही तर मशीदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिलाय. यावरही आझमी यांनी प्रतिक्रिया देताना, “मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही थंड पाणी, सरबत देऊ, धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण आम्हाला नको,” असे स्पष्ट केले आहे.

नक्की पाहा >> Video: भाषण सुरु असतानाच अजान सुरु झाली अन् गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी…; शिरुरमधील सभेतील व्हिडीओ चर्चेत

“वेगवेगळे उत्सव व विवाह समारंभातील डीजेंमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावरून राज ठाकरे यांनी कधी आवाज उठविला नाही,” असा आक्षेपही आझमी यांनी घेतलाय.

नक्की वाचा >> विश्लेषण : राज ठाकरेंनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर चर्चेत आलेलं २१०० कोटींचं ‘कोहिनूर स्क्वेअर’ प्रकरण आहे तरी काय?

“शिवाजी पार्क शांतता क्षेत्रात येते. मग त्यांच्या सभेच्या वेळी आवाजाची पातळी किती होती व किती ध्वनिप्रदूषण, याची पोलिसांनी तपासणी करून कारवाई करावी. सभा व अन्य कार्यक्रमांमध्ये लावले जाणारे ध्वनिवर्धक, फटाके यामुळेही ध्वनिप्रदूषण होते. पण आमची कधीच, काहीही तक्रार नाही,” असंही आझमी म्हणालेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After raj thackeray raised loudspeakers on mosques issue abu azmi says dj in navratri and ganpati also creates noise pollution scsg

ताज्या बातम्या