अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या फेरमतमोजणीमध्ये सोमवारी अभिनेता गटात सुशांत शेलार विजयी झाले. त्यांनी माजी अध्यक्ष विजय पाटकर यांचा १६ मतांनी पराभव केला. या विजयामुळे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या समर्थ पॅनेलचे १४ पैकी १३ संचालक झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या एप्रिल २०१६ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजेभोसले, सतीश रणदिवे यांच्या समर्थ पॅनेलने १४ पैकी १२ जागांवर विजय मिळवला होता. विजय पाटकर, सतीश बिडकर या क्रियाशील पॅनेलच्या दोन उमेदवारांनी विजय खेचून आणला होता.

तत्कालीन अध्यक्ष विजय पाटकर यांच्या अभिनेता गटातून विजयी होण्याला सुशांत शेलार यांनी धर्मादाय कार्यालयाकडे हरकत घेतली होती, पण ती फेटाळण्यात आली होती. त्यावर शेलार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने आज फेरमोजणी झाली, यावेळी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासह बहुतांशी संचालक उपस्थित होते.

नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले शेलार यांना ५९१ तर पाटकर ५७५ मते मिळाली. या यशाबद्दल बोलताना सुशांत शेलार म्हणाले, गेल्या अडीच वर्षाची लढाई आज संपली. माझी शंका अखेर खरी ठरली. या कामातून आनंद साजरा करणार आहे. तर, दुसरीकडे पाटकर म्हणाले, फेरमतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक झाली आहे त्यामुळे हा निर्णय मला मान्य आहे.

९ , १८ आणि १६ मतांचा खेळ

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची त्यावेळची प्रक्रिया रटाळ ठरली होती. मध्यरात्र उलटली तरी निकाल जाहीर होत नसल्याने अस्वस्थता वाढली होती. पहाटे निकाल जाहीर झाला तेव्हा पाटकर ९ मतांनी विजयी झाले होते. यावर शेलार यांनी आक्षेप घेतला होता, यानंतर दोन गटात वाद विकोपाला गेला. प्रकरण हातघाईवर आले, त्यानंतर पुन्हा मतमोजणी झाली तेव्हा पाटकर १८ मतांनी विजयी झाले. मात्र, यावरही आक्षेप घेत शेलार यांनी निकालाला थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यातून आज फेरमोजणी होऊन अखेर शेलार १६ मतांनी विजयाचे मानकरी ठरले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After recounting of votes sushant shelar won in the actor category of akhil bhartiya marathi chitrpat mahamandal election
First published on: 20-08-2018 at 18:08 IST