रत्नागिरी : रत्नागिरीतील आरे वारे समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या तरूणाच्या निधनानंतर वडीलानीही मुलग्याच्या विरहाने आपले प्राण सोडले. या घटनेने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरीतील आरे वारे समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या सिद्धार्थ विनायक फासे या मुलाचे वडील, रत्नागिरीचे माजी लेखापाल आणि विद्यमान वसई विरार महानगर पालिकेचे मुख्य लेखापाल विनायक सुरेश फासे यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला.
आरे वारे समुद्रात शनिवारी सिद्धार्थ विनायक फासे ( वय १९) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. सिद्धार्थ हा रत्नागिरीच्या कोषागार कार्यालयात काही वर्षांपुर्वी लेखापाल असलेले व सध्या वसई-विरार महानगर पालिकेचे मुख्य लेखा परिक्षक विनायक फासे यांचा मुलगा होता. विनायक फासे यांच्या डोळ्यासमोरच त्यांच्या तरुण मुलाचा मृत्यू झाल्याचा मोठा धक्का त्यांना बसला होता. रत्नागिरी येथे शवविच्छेदन केल्यानंतर मुलाचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी सांगली जिल्ह्यातील विटा येथे नेण्यात आला. त्याच्या मृतदेहावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले.
परंतु मुलावर अंत्यसंस्कार केल्यापासून वडील विनायक फासे अस्वस्थ होते. अशातच रविवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. मुलाच्या निधनाचे दुख: सहन न झाल्याने मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर बारा तासातच वडिलांनीही प्राण सोडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.