विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रविण दरेकर यांची निवड घोषित करण्यात आली आहे. या निवडीनंतर विधिमंडळ परिसरात आमदार दरेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, मी या पदाच्या माध्यमातून पक्ष आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असे म्हटले आहे.

याचबरोबर विधानपरिषदेचे मुख्य प्रतोद म्हणून आमदार सुरजितसिंह ठाकूर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर भाजापाचे ज्येष्ठ नेते आमदार भाई गिरकर यांना विधिमंडळ गटाचे उपनेता म्हणून भाजपाकडून जबाबदारी देण्यात आली आहे.

निवडीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार दरेकर म्हणाले की, भाजपाच्यावतीने विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेतेपदासाठी माझ नाव निश्चित करण्यात आलं आहे. तशाप्रकारचा ठराव पक्षाच्यावतीने करण्यात आलेला आहे. या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री व भाजपा अध्यक्ष अमित शाह, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेसाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटनमंत्री विजय पुराणिक आणि भाजपाच्या सर्व नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. विरोधीपक्ष नेतेपदाच्या व विधीमंडळाच्या माध्यमातून पक्षाला, जनतेला न्याय मिळवून देऊ अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वानुमते माझी निवड केल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली.या पदासाठी भाजपाचे आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे आघाडीवर होती. पण प्रविण दरेकर यांनी भाजपाच्या या दिग्गजांना मागे टाकत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवले आहे.