नसरापूर या ठिकाणी एका चार वर्षांच्या चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार केले. ज्यानंतर प्रचंड असा जनक्षोभ पुण्यातल्या नवले पुलावर पाहण्यास मिळाला. शुक्रवारी १ मे रोजी ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन ६५ वर्षीय इसमाने तिची हत्या केली. या प्रकरणात या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान नरसापूरचे ग्रामस्थ आणि पीडितेचं कुटुंब प्रचंड संतप्त झाल्याचं पाहण्यास मिळालं. या आक्रोशाने आंदोलनाचं रुप घेतलं आणि तोच संघर्ष पुण्यातील नवले पुलावर पाहण्यास मिळाला.
नसरापूरचं नेमकं प्रकरण काय आहे?
भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी चार वर्षांच्या मुलीवर एका ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार केले. त्यानंतर तिला दगडाने ठेचून ठार मारलं. आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद उमटले. नसरापूर भागातील ग्रामस्थांनी नवले पुलावर आंदोलन केलं. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थांची बाजू ऐकून घेत, आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल हे स्पष्ट केलं. नसरापूर भागात तणाव निर्माण झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. या घटनेचा निषेध नोंदवत नसरापूर ग्रामस्थांनी नसरापूर बंद ठेवलं होतं. तसंच आरोपीला फाशीची शिक्षा द्या ही मागणी केली.
पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल काय म्हणाले होते?
जी घटना घडली ती प्रचंड अप्रिय होती. लोकांचा भावनिक उद्रेक आम्हाला पाहण्यास मिळाला. लोक रस्त्यावर उतरले होते. आम्ही त्यांची समजूत घातली की हे पॉक्सोचं प्रकरण आहे. यात सबळ पुरावे गोळा करण्याची गरज आहे, त्यानंतर प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. त्यानंतर नरसापूर या ठिकाणी सुरु असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं. जो आरोपी आहे त्याच्यावर आधी विनयभंग आणि पॉक्सोमधला एक असे दोन गुन्हे दाखल आहेत. सदर मुलीला फूस लावून आरोपी घेऊन गेला होता, त्याबाबत तपासात आणखी माहिती पुढे येईल असंही गिल यांनी सांगितलं होतं. यानंतर रात्री पुण्यातील नवले पुलावर आक्रोश पाहण्यास मिळाला.

पुण्यातल्या नवले पुलावर नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणातील चिमुरडीला न्याय द्या, नराधमाला फाशी द्या अशी मागणी करत नवले पुलावर आंदोलन करण्यात आलं. संतप्त ग्रामस्थांनी आणि पीडितेच्या नातलगांनी पीडितेचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून हे आंदोलन केलं. सुमारे चार ते पाच तास हे आंदोलन सुरु होतं. ज्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तसंच नवले पुलावर प्रचंड गर्दीही झाली होती. पोलिसांनी, वाहतूक पोलिसांनी या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला. आंदोलकांनी माघार घेण्यास पूर्णपणे नकार दिला. अखेर पोलिसांना बळाचा वापर करत सुमारे चार ते पाच तासांनी हा पूल मोकळा करावा लागला.
पोलिसांना नवले पुलावर बळाचा वापर का करावा लागला?
आंदोलक प्रचंड प्रमाणावर आक्रमक झाले होते, नवले पुलावर प्रचंड गर्दीही निर्माण झाली होती. त्यामुळे पुण्यातल्या नवले पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहण्यास मिळाली.
पुण्याचे आयुक्त या ठिकाणी पोहचले, त्यांनी आंदोलकांशी आणि पीडितेच्या कुटुंबाशी चर्चा केली आणि आंदोलन मागे घ्या आम्ही आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा देऊ असं आश्वासन दिलं.
वाहतूक कोंडी झाली होती, तेव्हा अनेक लोक वाहनं सोडून गेल्याचं दिसून आलं. एक रुग्णवाहिकाही या ठिकाणी वाहतूक कोंडीत अडकली होती. वारजेपासून पुढपर्यंत वाहतूक कोंडी होती.
मात्र आंदोलक प्रचंड आक्रमक झाले होते, त्यांनी आंदोलन मागे घेतलं नाही. सुमारे चार ते पाच तास हे आंदोलन सुरु होतं त्यामुळे अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. ज्यानंतर हळूहळू नवले पुलावरची वाहतूक पूर्वपदावर आली.
पीडितेच्या वडिलांनी नेमकं काय म्हटलं आहे?
माझी मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की त्यांनी प्रत्यक्ष यावं आणि आम्हाला लेखी द्यावं की नराधमाला आम्ही फाशीची शिक्षा देऊ. तसं नसेल तर त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्यावं. आम्ही त्याचा काय तो सोक्षमोक्ष लावू या आमच्या दोनच मागण्या आहेत. २०१९ मध्ये या आरोपीने त्याच्या पुतणीवर बलात्कार केला होता. सहा महिने तो तुरुंगात होता आणि त्यानंतर तो सुटला. आता त्याने माझ्या मुलीवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. २०१९ मध्ये तो आरोपी का सुटला? हा आरोपी या वेळेसही सुटणार नाही याची खात्री सरकार देऊ शकतं का? जर मुख्यमंत्री मिसिंग लिंकच्या उद्घाटनाला येऊ शकतात तर त्यांनी इथेही आलं पाहिजे ही माझी मागणी आहे. असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.
आंदोलकांचं म्हणणं काय?
पोलिसांनी बळाचा वापर करुन आंदोलन संपवल्यानंतर आंदोलकांनी सरकार आणि प्रशासनावर टीका केली. नराधमाला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांचा वापर करून आंदोलकांना हटवलं, सरकारची आम्हाला लाज वाटते, अशा शब्दात आंदोलकांनी टीका केली. दडपशाहीचा वापर करणारं हे इंग्रजांचं सरकार आहे, असंही काही आंदोलकांनी म्हटलं. आंदोलन करणं हा आमचा हक्क आहे. आरोपीला फाशी द्या ही आमची मागणी आहे. त्या नराधमाला जागच्या जागी संपवा, त्याला चौकात फाशी द्या किंवा गोळ्या घाला अशी आमची मागणी आहे अशा संंतप्त प्रतिक्रियाही नागरिकांनी दिल्या.
