scorecardresearch

रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेच्या गंभीर आरोपानंतर चित्रा वाघ यांनी घेतली पत्रकारपरिषद, म्हणाल्या…

“माझ्या घरावर पण हल्ले करून झाले, आता तुम्ही…” असं म्हणत महाविकासआघाडी सरकाराल दिला आहे इशारा

(संग्रहीत छायाचित्र)

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावरती बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने आज गौप्यस्फोट केला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीच आपल्याला फुस लावल्याचं तिने म्हटलं आहे. शिवाय, चित्रा वाघ यांनी आपल्याला सुसाईड नोट लिहिण्यास भाग पाडलं असल्याचा आरोप केला आहे. या खळबळजनक आरोपांनंतर भाजपा नेते चित्रा वाघ यांनी पत्रकारपरिषद घेत आपली बाजू मांडली. शिवाय, पीडित मुलगी जे काही बोलत आहे त्याची सखोल चौकशी करा, मी देखील जिथे बोलावाल तिथे चौकशीसाठी यायला तयार आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

पत्रकारपरिषदेत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, “राजकारणात आणि समाजकारणात काम करत असताना, अनेक नवीन विविध अनुभव येत असतात त्यातलाच एक अनुभव हा आजच आणि नुकताच मला आलाय. त्याचं उत्तर देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेली आहे. विषय आहे पुण्यातील शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचिक याने एका मुलीवर बलात्कार केला. जबरदस्तीने तिचा गर्भपात केला, तो देखील चार विविध ठिकाणी नेऊन. अशा पद्धतीचं पत्र आणि प्रत्यक्ष भेट ही पीडितेची आणि माझी झाली.”

“१६ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली, मी महाराष्ट्राच्या बाहेर होते आणि एका मुलीचा मला फोन आला. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये मला गुन्हा दाखल करायचा आहे आणि तुमची मदत हवी आहे, असं तिने सांगितलं. मी त्या दिवशी महाराष्ट्रात नव्हते, त्यामुळे आल्यावरती भेटू आणि गरज लागली तर नक्की फोन कर असं मी तिला सांगितलं. त्यानंतर पुण्यात पीडितेची आणि माझी भेट झाली. तिने तिची घडलेली आपबिती २०१७ पासूनची सगळी माझ्यासमोर सांगितली. असा कोणी माणूसच नाही या पृथ्वीवर की ज्याने हे सगळं ऐकल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही किंवा तो विचार करायला भाग पडणार नाही. तसंच माझ्यासोबतही झालं एक मुलगी जी कुणाच्याही पाठिंब्याशिवाय लढते आणि तिच्या एकटेपणाचा कुठेतरी गैरफायदा घेतला जातोय. एकदा, दोनदा नाहीतर तीनवेळा अशा पद्धतीचा प्रकार तिच्यासोबत घडला आणि हो तिच्याबाजूने लढायचं मी ठरवलं, चूक केली का? एखादी पीडिता जर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येऊन सांगते आहे, त्या पुराव्यासह ती मांडते आहे. मला काय माहिती कुठले पुण्यातले चार रुग्णालयं, मला काय माहिती की मंगेशकर रुग्णालयास कुचिकचं कुठलं ओळखपत्र देण्यात आलं. मात्र ही सगळी माहिती मला त्या मुलीकडूनच मिळाली. जेव्हा त्या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की, नाही ही एकटी लढत आहे अशावेळी आपण तिच्यासोबत उभा राहिलं पाहिजे, चूक केली का मी? म्हणून मी तिच्याबाजूने उभा राहिले. मी जेव्हा पुण्यात आले होते तेव्हा तिने मला येऊन सांगितलं होतं की तिला कसा त्रास दिला जातोय. तीनवेळा तर मी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना सांगितलं आहे की, तिची तब्येत बरी नाही तिच्यावर उपचार करा. परवा तिला आमच्या वैद्यकीय आघाडीच्या महिलांनी ससून हॉस्पिटला देखील नेलं होतं. मुलगी तिथं अॅडमिट व्हायला तयार नव्हती, तिथून ती स्वत: जहांगीर हॉस्पिटला गेली आणि मला मेसेजे केला मी मला डिपॉझिटसाठी पैसे हवे आहेत, मला मदत करा. मी तिला तू जहांगीरला का गेलीस असं विचारल्यावर तिने मला ससूनमध्ये माझ्यावर योग्य उपचार होत नाही, मला तिथे नीट वागवलं नसल्याचं तिने सांगितलं आणि जहांगीर हॉस्पिटलला गेली. तिथे देखील आमच्या डॉक्टर ताई होत्या त्यांनी पैसे भरले आणि त्या मुलीवर उपचार केला. ही चूक झाली का आमची? या सगळ्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळतील.”

मला सुसाईड नोट लिहिण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले – रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेचा खळबळजनक आरोप!

“ती जेव्हा एकटी लढत होती तेव्हा महाराष्ट्रातील कुठली महिला किंवा पक्ष तिच्या मदतीसाठी आला नाही. कुठल्या पक्षाची म्हणून मी तिला मदत केलीच नाही आणि आज तिने चित्रा वाघच्या विरोधात बोलायला सुरुवात केली तर सगळ्या महिला नेत्या एकत्र आल्या. विद्या चव्हाण काय सांगताय की मी ब्लॅकमेल करते, कुणाला ब्लॅकमेल केलं? मागे देखील मी त्यांना सांगितलं होतं की तोंड सांभाळून बोला. नाही तुम्हाला मदत करायची इतरांना तर करू नका, पण आमच्यासारखे जे काही धडपड करताय, त्यांच्यावर खोटे आरोप करताय, झोपला होता का फेब्रुवारीपासून? ती सगळ्यांकडे गेली होती आणि तिने तिच्या आपबितीत सांगितलं आहे.”

रघुनाथ कुचिक प्रकरणास लागणार वेगळं वळण?; पीडितेचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना भेटीसाठी फोन!

“आता ती कुठल्या मजबुरीमध्ये आहे, ती हे सगळं का करते आहे हे मला माहिती नाही.परमेश्वर तिचं भलं करो. मी केवळ ती एकटी लढते आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी मी तिच्यासोबत उभा होते. त्यावेळा कुणी आलं नाही, तेव्हा या प्रकरणाचं महत्व वाटलं नव्हतं का? पण जेव्हा माझं नाव आलं आणि मला अशा पद्धतीने चित्रा वाघने करायला लावलं असं जेव्हा त्या मुलीने सांगितलं, तेव्हा मात्र सगळे खडबडून जागे झाले. आता कदाचित नवीन एफआयआर पण करतील, आम्हाला अडकवायला. पण जर तुम्हाला असं वाटत असेल, हे सरकारला मला सांगायचं आहे की हे सगळं करून तुम्ही माझा आवाज बंद कराल. तर हा तुमचा गैरसमज आहे. माझ्या घरावर पण हल्ले करून झाले, आता तुम्ही मला असल्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करताय. पण माझी सगळी तयारी आहे. जिथं बोलवाल त्या ठिकाणी चौकशीला येण्याची माझी तयारी आहे. काल दुपारीच त्या मुलीचा मला मेसेज आला होता, मी फोन केले तिने उचलेले नाहीत, माझा सीडीआर रिपोर्ट देखील पोलीस काढू शकतात. ती मुलगी जे बोलतेय ते सगळं तपासा, माझी तयारी आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After the serious allegations of the victim in the raghunath kuchik case chitra wagh held a press conference msr

ताज्या बातम्या