कोल्हापूर महापालिकेमध्ये नगरसेवक विरुद्ध अधिकारी यांच्यातील वादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महापालिकेचा गाडा चालविताना आपली भूमिका अधिक महत्त्वाची असा अहंभाव नगरसेवक व अधिका-यांमध्ये निर्माण झाला असल्याने त्यातून दोघांमध्ये खटके उडू लागले आहेत. मुद्दय़ावरून गुद्दय़ावर येण्याचा प्रकार घडू लागल्याने त्याचा प्रशासनावर परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना अशा प्रकारचा वाद पुनपुन्हा होऊ लागल्याने तो चिंतेचा विषय बनत चालला आहे. एका अधिका-यास दोघा नगरसेवकांनी केलेली मारहाण आणि जलअभियंता मनीष पवार यांच्या अनुपस्थितीत त्यांना स्थायी समितीत केले गेलेले लक्ष्य या दोन बाबी नगरसेवक विरुद्ध प्रशासन यांच्यातील सामना कसा रंगत चालला आहे हे सांगण्यास बोलक्या ठरल्या आहेत.
महापालिका अधिका-यास मारहाण करण्याचे प्रकरण दोघा नगरसेवकांना अंगलट येत असल्याचे दिसत आहे. नगरसेवक दिगंबर फराकटे व प्रकाश नाईकनवरे यांच्या प्रभागात एलईडी बल्ब बसविण्यासाठीचा मुद्दा वादास कारणीभूत ठरला होता. त्यातून २५ मे रोजी फराकटे व नाईकनवरे यांनी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांच्या कार्यालयातून शिवीगाळ करून मारतच शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या कार्यालयात ओढत नेले. या घटनेची तक्रार पवार यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली.
त्यानुसार फराकटे व नाईकनवरे यांना नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर, फराकटे व नाईकनवरे यांच्याकडून वारंवार अधिकारी कर्मचा-यांना मारहाण होत असल्याने त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासन पावले टाकू लागले आहेत. यातून प्रशासन विरुद्ध नगरसेवक यांच्यातील वाद न्यायालयाच्या कोर्टापर्यंत जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
हा वाद ताजा असतानाच नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बठकीतही प्रशासन विरुद्ध नगरसेवक यांच्यातील सामन्याचे दर्शन घडले. जलअभियंता मनीष पवार हे प्रकृती अस्वास्थ्य असल्यामुळे रजेवर आहेत. त्यामुळे स्थायीच्या बठकीस ते उपस्थित राहू शकले नाहीत नेमका हाच मुद्दा स्थायीच्या बठकीत काही नगरसेवकांनी प्रतिष्ठेचा केला. काळम्मावाडी थेट पाणी योजनेचे काम रडतखडत सुरू असल्याचा मुद्दा मांडून याचे उत्तर द्यावे लागू नये म्हणून जलअभियंता आजारी असल्याचे निमित्त करतात, असा जावई शोध या सदस्यांनी लावला होता. यातून अधिका-यांच्या मनामध्ये नगरसेवकांच्या आक्रमक स्वभावाची धास्ती निर्माण झाली आहे. शिवाय नगरसेवक व प्रशासन यांनी एकदिलाने काम करण्याऐवजी दोन्ही घटकातील दरी दिवसेंदिवस रुंदावत चालल्याचेही दिसत असून त्याचा एकंदरित परिणाम महापालिकेच्या प्रशासनावर होत आहे हेच त्यांच्या गावी नाही, हे आणखी एक दुर्दैव होय.