लोकसभा निवडणुकीत कर्जत तालुक्याने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष म्हणजेच खासदार दिलीप गांधी यांनाच भक्कम साथ दिली. गांधी यांना तालुक्यातून तब्बल ४१ हजार ५५२ मतांची आघाडी मिळाली.
तालुक्यात मागच्यापेक्षा यंदा जास्त मतदान तालुक्यात झाले होते. त्यात १० टक्के वाढ झाली. गांधी यांना १ लाख ६ हजार ५५२ तर राष्ट्रवादीचे राजीव राजळे यांना अवघी ६५ हजार मते मिळाली. तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप-सेनेला यश मिळत नाही, मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हा युतीचा बालेकिल्ला आहे. राज्याच्या व देशाच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील मतदारांचा काँग्रेस व राष्ट्रवादीवर, त्यांच्या नेत्यांवर विश्वास नाही. याला स्थानिक नेतेच जबाबदार आहेत. भाजप-शिवसेना युतीचे सरकार निवडून आले तरच तालुक्याचा विकास होऊ शकतो, अशी येथील जनतेची अशी मानसिकता झाली आहे. त्याला पाणी हे मुख्य कारण आहे.
गांधी यांची तालुक्यातील ग्रामीण भागाशी वेगळी नाळ जोडली गेली आहे. उमेदवारी मिळण्याच्या आधीही त्यांच्या सभांना येथे भरभरून प्रतिसाद मिळत असे. मध्यंतरी ते आजारी असल्याने त्यांचा तालुक्याचा संपर्क कमी झाला होता, मात्र नाळ कायम होती. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीला आमदार राम शिंदे यांनी विरोध करणे मतदारांना भावले नव्हते. गांधी यांचा प्रचारास तालुक्यात सुरुवात अडखळतच झाली. आमदार शिंदे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नामदेव राऊत हे गांधी यांना उमेदवारी दिल्याने नाराज होते. मात्र नंतर सगळी भट्टी जमून आली.
राजळे यांना तालुक्यात त्यांची प्रतिमाच उभी करता आली नाही. त्यांनादेखील पक्षामधून मोठा विरोध होता. त्यांनी प्रचारात सुरुवातीला आघाडी घेतली, मात्र या नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आलेच नाही. राजेंद्र फाळके हे राष्ट्रवादीचे तालुक्यातील प्रमुख नेते आहेत. ते तालुकाभर फिरले, मात्र त्यांची नाराजी कायम होती. तालुक्यातील काँग्रेस विखे व थोरात अशी विभागली आहे. राजळे थोरात गटाचे मानले जातात, त्यामुळे विखे गटाचे अंबादास पिसाळ वगळता कोणीही प्रचारात सक्रिय दिसले नाही. राजळे यांची प्रचारयंत्रणाही पाथर्डीतील कार्यकर्त्यांकडे होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दमबाजीही राजळे यांना तापदायक ठरली.