जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असून गेल्या २४ तासांत एकूण एकूण सरासरी १०.४१ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ाच्या विविध भागात भात, भुईमूग, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. सोमवारी पावसाने उघडीप दिली असली, तरी वातावरण हिवाळी-पावसाळी होते. थंडीचा कडाका वाढत चालला आहे.
तीन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्य़ातील शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. हातकणंगले तालुक्यात सलग  पावसामुळे सोयाबीन आणि भात पिकाच्या मळणीला विलंब होणार आहे. ऊस, शाळू पिकासाठी पोषक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वातावरणात होणाऱ्या वेगवेगळ्या बदलामुळे ऐन थंडीच्या काळात पाऊस लागला आहे. उशिरा पेरलेला सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र या पावसामुळे सोयाबीनची मळणी रखडणार आहे. तालुक्यामध्ये भाताचे प्रमाण अत्यल्प असल्याने भात पिकाचे फारसे नुकसान झाले नाही तर वीज, वारा, वादळी पाऊस पडत असल्याने कोणतेही नुकसान झालेले नाही. ऊस उत्पादक शेतकरी व शाळू पिकाला हा पाऊस योग्य व फायदेशीर असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असून विहिरींना पाणी वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने गडिहग्लज परिसराला झोडपून काढल्यामुळे शेतपिकांचे नुकसान झालेले आहे. या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला मान्सून पावसाने दमदार सुरुवात केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. दुष्काळ जाहीर करण्याची वेळ शासनावर आली होती. याचवेळी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. या वर्षी पावसाने पिकांच्या वाढीवेळी व पोषकतेसाठी आवश्यक असलेल्या वेळी हजेरी लावल्याने पिके चांगली आली. पण, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने झोडपून काढल्याने हातातोंडाशी आलेली पिके पावसात राहिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. भात मळण्या पूर्ण झालेल्यांनी शेतात पसरलेले िपजर पावसाच्या पाण्यात तरंगत आहे. यामुळे पिकासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे उशिराने पेरणी झालेली सोयाबीन पीक अजूनही शेतातच उभे आहे. कापणीच्या वेळीच पावसाने हजेरी लावल्याने उभ्या सोयाबीनच्या पिकातून अंकुर फुटण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसामुळे भुईमूग जमिनीतच राहिल्यास ते पुन्हा उगवण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील गुऱ्हाळघरे ओस पडली आहेत.
करवीर तालुक्यात परतीच्या पावसाने गेले तीन दिवस हजेरी लावली आहे. त्यामुळे ऐन सुगीच्या हंगामात सुरू झालेल्या पावसाने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. भात कापणी, भुईमूग, सोयाबीन काढणे आदी पिकांची काढणी चालू आहे. परंतु पावसाने सुरुवात केल्याने भात वाळविणे, वारे देणे, िपजर वाळविणे, भुईमुगाच्या शेंगा व सोयाबीन वाळविणे, स्वच्छ करणे आदी कामात अडचणी आल्या आहेत. भुदरगड तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे. भुदरगड तालुक्यात कापणी मळणीचा हंगाम सुरू असून भातांच्या कापण्या पूर्ण झाल्या आहेत. निमगरवी भात कापणीस तयार आहेत. नाचणी, भुईमूग, वरी, काराळी आदी पिकेही घेतली जातात. पावसाने भातपिके भुईसपाट झाली.