एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा

बीड : एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर महामंडळाने निलंबनाची कारवाई केली आहे. प्रशासनाची ही कारवाई किरकोळ असून आम्हाला फासावर लटकवले तरी आता माघार घेणार नाही, अशी भूमिका बीड आगारातील कर्मचाऱ्यांनी घेतली. संपाला पाठिंबा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत एसटीच्या विश्रामगृहाचे कुलूप तोडले.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा जगदाळे यांनी निदर्शने केली. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी योग्य असून महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, सूडबुध्दीने ३७६ कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई तात्काळ रद्द करण्यात यावी आणि कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार परिवहन मंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली. मनसे महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विश्रामगृहासह स्वच्छतागृहाचे कुलूप तोडले. दोन दिवसांपूर्वी एसटीच्या प्रशासनाने याठिकाणी कुलूप लावले होते. मात्र मनसेने आक्रमक भूमिका घेत कुलूप तोडले. यापुढे कुलूप लावल्यास संबंधित अधिकाऱ्यांचे तोंड फोडू असा इशारा महिला पदाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान संपकरी कर्मचाऱ्यांवर झालेली निलंबनाची कारवाई ही किरकोळ असुन आम्हाला फासावर लटकवले तरी माघार घेणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. गुरुवारी सकाळपासुनच कर्मचारी बसस्थानकासह विभागीय कार्यालय व कार्यशाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरही ठाण मांडून बसले होते.

खाजगी वाहने बसस्थानकात लावली जात असल्याने बसेस आडव्या लावण्यात आल्या होत्या. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होऊ लागले आहेत.

औरंगाबादमध्येही मनसेचे आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात भेट घेतल्यानंतर अनेक ठिकाणी मनसे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले. औरंगाबादेत संपाला पाठिंबा दर्शवून एसटीचे विलीनीकरण करण्याविषयीची भूमिका मांडून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, सतनामसिंग गुलाटी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.