धुळे शहराचा पाणी प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्हे आता निर्माण झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक सामाजिक संघटना, पक्ष, धुळेकर नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून अनेक आंदोलन केली. मात्र धुळे मनपा प्रशासन पाण्याच्या संदर्भात अद्यापही योग्य नियोजन करू शकलेली नाही. त्यामुळे आज धुळे मनपाच्या नगरसेवकावर पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे संपूर्ण शहरात पाणीच पाणी झाले असले तरी, मात्र नागरिकांच्या नळाला मात्र कोरड असल्याचे दिसून येत आहे. धुळे महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे मुबलक पाणीसाठा असून देखील शहरात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शहरातील नगरसेवकासह नागरिकांना पाण्यासाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनं करावी लागत आहेत.

धुळे शहरातील देवपूर परिसरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने, या परिसरातील नगरसेवक व नागरिकांनी थेट देवपूर परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवरंग पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. देवपूर परिसराला पाण्याचा पुरवठा करणारी जुनी नवरंग पाण्याची टाकी ही जीर्ण झाली असून, त्यामधून खराब पाणीपुरवठा होत आहे. गेल्या दीड वर्षांपूर्वीच नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे, मात्र या नवीन पाण्याच्या टाकीचा अद्यापपर्यंत काहीही उपयोग झालेली नाही.

देवपूर परिसराला पाणी पुवठ्यासाठी बांधण्यात आलेली नवीन नवरंग पाण्याची टाकी जोपर्यंत कार्यरत होत नाही आणि देवपूर परिसरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरच बसून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक सईद बेग यांच्यासह नागरिकांनी घेतला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation of citizens with corporator by climbing on water tank in dhule rno news msr
First published on: 24-09-2022 at 18:52 IST