सातारा: सातारा शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तासभर पडलेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. ओढे-नाले तुडुंब भरून वाहिले. लिंब-बसाप्पाचीवाडी रस्ता पाण्याखाली गेला. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
वाई शहर व तालुक्यात दुपारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. अचानक आलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे बागायती क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्यासह इतर फळांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. विजेचे खांब आडवे झाल्याने चार तास वीज गायब होती. जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाने बाजारपेठेतील व्यावसायिकांची त्रेधातिरपीट उडाली.
सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दुपारच्या वेळी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. शहर व परिसरातील रस्त्यावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहताना दिसत होते. सखल भागात जोरदार पावसाने ओढ्याला पूर येत पूल पाण्याखाली गेला. अचानक आलेल्या पावसामुळे शहर व परिसरासह बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या व्यापारी, नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक रस्ते जलमय झाले. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागली.
सध्या ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या मशागतीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या पावसामुळे केळीच्या बागांचे मोठे तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात धूळवाफेवर पेरण्याची कामे सुरू आहेत. तर काही ठिकाणी भात लागणीसाठी भाताचे तरवे टाकण्याचे काम सुरू आहे. अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे काही ठिकाणी मशागतीसाठी वाफसा येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. उन्हाळी हंगामातील भुईमूग पिकाची काढणीची कामे सुरू आहेत. पावसामुळे बहुतांश ठिकाणी भुईमूग काढणी लांबली असल्याने शेंगांना कोंब फुटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तसेच उन्हाळी ढोबळी मिरची, भुईमूग, काकडी, टोमॅटो, भाजीपाला या पिकांना पावसाचा फटका बसला.