रायगड जिल्हय़ातील अलिबाग, माणगांव, खालापूर व पेण या तालुक्यात कृषी उद्योजकता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प सन २०१५-१६ अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जाणार असून यासाठी जागतिक बँक सहकार्य करणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला गुणवत्तापूर्ण बनविणे, शेतमालाचे काढणीपश्चात व्यवस्थापन प्रक्रिया, मूल्यवर्धन, कृषिमालाची थेट विक्री आदींच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढविणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असल्याचे रायगड जिल्हा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक एस. एम. डावरे यांनी सांगितले आहे.
जिल्हय़ातील पीक उत्पादनात वाढ, उत्पादित मालाची गुणवत्ता वाढवून निव्वळ नफ्यात वाढ आणि बाजार संपर्क व्यवस्थेद्वारे कृषी व्यावसायिकतेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ई.डी.पी. उपक्रमासाठी प्रकल्पांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये काढणी तंत्रज्ञान व्यवस्थापन, धान्य व फळेविषयक प्रकल्प अहवाल, मूल्यवर्धन प्रक्रिया, प्रतवारी व पणन संदर्भातील प्रकल्प अहवाल, कृषी व पणनविषयक प्रकल्प अहवाल, कृषी मूल्यवर्धनासाठी यांत्रिकीकरणाविषयक प्रकल्प अहवाल, कृषी व्यवसायाला प्रोत्साहन मिळण्यासाठी उपक्रम, शेतकरी गटाने कृषी अवजारे सामूहिक भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय, बाजाराभिमुख सेंद्रिय कृषी उत्पादन, प्रतवारी व पणन याबाबत प्रोत्साहन देणारे प्रकल्प अहवाल तसेच पशुसंवर्धनसंबंधित प्रकल्प अहवाल आदींचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रकल्प खर्चात ५० टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपये अनुदान प्रकल्पअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना फक्त मशीनरी व उपकरणे या बाबींकरिताच अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. यापुढे नव्याने सुरू होणारे प्रकल्प ग्राहय़ धरण्यात येणार असून व्यवसायाकरिता कर्ज हवे असल्यास ते राष्ट्रीयीकृत बँकेकडूनच घ्यावे लागणार आहे. प्रकल्प व लाभार्थीची निवडप्रक्रिया जिल्हास्तरीय निवड समितीद्वारे करण्यात येऊन राज्यस्तरीय मंजुरीनंतर अनुदान वितरण होईल. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अलिबाग (०२१४१/२६६७२९), पेण-(०२१४३/२५२३५१), खालापूर- (०२१९१/२६६७२९१), माणगाव- (०२१४०/२६३०९१) तसेच प्रकल्प संचालक आत्मा अलिबाग (०२१४१/२२६४८८) येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) रायगड-अलिबाग यांनी केले आहे.