मोहनीराज लहाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर : राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात (राहुरी, नगर) पदव्युत्तर व आचार्य (पीएच.डी.) शिक्षण घेणारे अधिकृत विद्यार्थी व विद्यापीठाच्या वसतिगृहात, आवारात अनधिकृतपणे राहणारे विद्यार्थी (पॅरासाइट स्टुडंट) यांच्यामध्ये संघर्षांचे वातावरण निर्माण झाले आहे. या संघर्षांत हळूहळू राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप होऊ लागला आहे.

 या दोन गटांतील संघर्षांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी विद्यापीठाने अंतर्गत एक व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी, अशा दोन सत्यशोधन समित्या स्थापल्या आहेत. मात्र त्यातून एक वेगळाच प्रश्न समोर आला आहे, तो म्हणजे विद्यापीठ कोणासाठी? कृषी शिक्षणासाठी? कृषी संशोधनासाठी? झालेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी? की विद्यापीठ हे स्पर्धा परीक्षा केंद्र चालवणारे?. समिती संघर्षांची कारणे शोधीलही. मात्र या प्रश्नांची उत्तरे कोण आणि कशी देणार हे अनुत्तरितच राहणार आहे.

गेल्या काही वर्षांत म. फुले कृषी विद्यापीठातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या (केवळ एमपीएससी व यूपीएससी, इतर नव्हे) माध्यमातून सरकारी सेवेत अधिकारी म्हणून दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले आहे. या कारणांची बरीच चर्चा होत आहे. शिवाय अशा अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र लॉबीही राज्यात कार्यरत जात असल्याची चर्चा आहे. आजी-माजी विद्यार्थ्यांच्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने राहुरी पोलिसांना एक पत्र दिले. विद्यापीठाच्या आवारात पदव्युत्तर व आचार्य शिक्षण घेणाऱ्या २७७ विद्यार्थ्यांसाठी चार मुलांचे व दोन मुलींचे वसतिगृह आहेत. मात्र या विद्यार्थ्यांबरोबरच वसतिगृहातून बरेचसे विद्यार्थी अनधिकृतपणे राहत असल्याच्या तक्रारी विद्यापीठ प्रशासनास प्राप्त झाल्या आहेत.

अर्थात ती वेळ आली नाही. मात्र अनेक विद्यार्थ्यांची प्रशासनालाच आवारातीलच शेतकरी भवनाह्णत वास्तव्याची व्यवस्था करावी लागली आहे. याचे कारण अनुत्तरित आहे. या घडामोडींना कारण ठरले तो काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेला संघर्ष. विद्यापीठाच्या आवारात अधिकृत विद्यार्थी कमी संख्येने आणि अनधिकृत विद्यार्थी अधिक संख्येने, म्हणजे ३५०-४०० आहेत. संघर्षांतून मध्यरात्री कुलगुरूंच्या कार्यालयावर दगडफेक, दहशतीमुळे अधिकृत विद्यार्थ्यांवर स्वत:ला कोंडून घेण्याची वेळ येणे, ठिय्या आंदोलन, पोलिसांनी तेथे धाव घेणे असे प्रसंग उद्भवले.

अधिकृत विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार अनधिकृतपणे वास्तव्य करणारे बहुतांशी विद्यार्थी कोल्हापूर, पुणे, धुळे, सोलापूर जिल्ह्यातील व त्यांचे पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले आहे. केवळ स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी ते वसतिगृहातच अनधिकृतपणे, मोफत राहतात. विद्यापीठाच्या साधनसामग्रीचा मोफत वापर करतात. स्वतंत्र खानावळ चालवतात. त्यांची कृषी एकता मंचह्ण नावाची संघटना आहे. वसतिगृहात एका खोलीत एकास राहण्यास परवानगी असतानाही अनधिकृतपणे किमान चार ते पाच विद्यार्थी अनेक वर्षांपासून राहतात. या सर्वाचा विद्यापीठाच्या व्यवस्थेवर, आमच्या अभ्यासावर, संशोधनावर परिणाम होतो. आमची गुणवत्तेनुसार निवड झाली आणि शुल्क भरून वसतिगृहात राहतो. परंतु अनधिकृतांची दहशत आम्हाला सहन करावी लागते.

तर अनधिकृत विद्यार्थ्यांच्या दाव्यानुसार आम्ही विद्यापीठाचेच माजी विद्यार्थी आहोत, बाहेर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खाजगी क्लासचा मोठा खर्च करणे परवडत नाही, आम्ही शेतकऱ्यांचीच मुले आहोत. विद्यार्थ्यांच्या सहकार्यानेच वसतिगृहात राहतो. अनेक वर्षांपासून ही व्यवस्था चालू आहे. यापूर्वी कोणताही संघर्ष झाला नाही. आमचा कोणताही त्रास विद्यापीठ प्रशासन किंवा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना होत नाही.

त्यानंतर विद्यापीठाच्या आवारात जाऊन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या भेटी घेतल्या. त्यापाठोपाठ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत कुलगुरू, जिल्हाधिकारी, विद्यार्थ्यांच्या दोन्ही गटाचे प्रतिनिधी, प्रशासनातील अधिकाऱ्यांची एकत्र बैठक झाली. आता लोकसेवा आयोगाची आगामी परीक्षा होईपर्यंत पॅरासाइट स्टुडन्टह्णची व्यवस्था शेतकरी भवनात करण्यात आली आहे.

कृषी विद्यापीठात घडलेल्या घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीला १० दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या अहवालानुसार कारवाई करण्याचे अधिकार कुलगुरूंना देण्यात आले आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षेपर्यंत पॅरासाइटह्ण विद्यार्थी तेथे राहू शकतील. तोपर्यंत राहण्यासाठी नियमावली तयार करून लेखी घेतले जाईल. नियमांचा भंग झाला तर कारवाईचे अधिकार विद्यापीठाला असतील. आवश्यकता वाटल्यास नवीन पॅरासाइटह्ण विद्यार्थी दाखल करून घेण्याबाबत सरकार स्तरावरून विद्यापीठाला सूचना केल्या जातील.

-राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री.

या सर्व घडामोडींसंदर्भात मी काही बोलू इच्छित नाही.

-डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू.

विद्यापीठात अनधिकृतपणे माजी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी राहत आहेत. त्यांचे व विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले. हा संघर्ष कशामुळे झाला? अनेक वर्षांपासून पॅरासाइटह्ण विद्यार्थी राहात होते, मात्र यापूर्वी संघर्ष झाला नाही. तो आता का झाला, याविषयी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपर्यंत पॅरासाइटह्ण विद्यार्थी तेथे राहू शकतील.

-डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, नगर.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agricultural university education competitive examination question arising student struggles ysh
First published on: 18-08-2022 at 00:02 IST