ग्रामीण व कृषी पर्यटनासाठी कोकणासाठी सुमारे ६१ कोटी प्रस्तावित आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरीचा दौरा करून राज्याचे ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव व्ही. गिरिराज अभ्यास करतील. त्यानंतर विकास योजनांचा आराखडा निश्चित होईल, असे ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना सांगितले.
रत्नागिरी व सिंधुदुर्गचा अभ्यास दौरा सुरू आहे. त्यानंतर उद्योजकांशी चर्चा करू. शासनाच्या ग्रामीण व कृषी पर्यटनाच्या धोरणाचा आराखडा कोकण कृषी विद्यापीठाला सोबत घेऊन बनविला जाईल असे राज्याच्या ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव व्ही. गिरिराज यांनी बोलताना सांगितले. या वेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग उपस्थित होते. ग्रामीण पर्यटनासाठी कोकणासाठी ४८ कोटी मंजूर आहेत, तर मागील १९ कोटी बाकी आहेत. सुमारे ६१ कोटी रुपये कोकणाच्या ग्रामीण व कृषी पर्यटनासाठी मिळतील. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाला सोबत घेऊन धोरण निश्चित केले जाईल, असे राज्यमंत्री केसरकर म्हणाले. शेतकऱ्यांना ग्रामीण व कृषी पर्यटनासाठी प्रशिक्षण देताना स्किल कसे विकसित होईल याकडे लक्ष देण्याचा विचार राज्यमंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.
ग्रामीण व कृषी पर्यटनासाठी अभ्यासक्रम करून प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी कमी कालावधीचा हा प्रशिक्षण कालावधी ठेवला जाईल. सिंधुदुर्गात ग्रामीण व कृषी पर्यटनासाठी ११ कोटी रुपये सध्या उपलब्ध आहेत, असे राज्यमंत्री केसरकर म्हणाले.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचा दौरा करून ग्रामीण व कृषी पर्यटनाचा अभ्यास करत आहोत. या दरम्यान उद्योगाचा अभ्यास होईल. या क्षेत्रात स्थानिक उद्योगपतींशी चर्चा करण्यात येईल. या दोन्ही जिल्ह्य़ांची भौगोलिक परिस्थिती जाणून घेत आहे, असे ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव व्ही. गिरिराज यांनी बोलताना सांगितले. दरम्यान, सावंतवाडी नगरपालिका शिल्पग्राम, पंचकर्म प्रकल्पही ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव व्ही. गिरिराज यांनी पाहिले. त्यांचे स्वागत नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी केले. आपण हे प्रकल्प पाहिले. माझा हा अभ्यास दौरा असल्याने मी प्रकल्पांना भेटी देऊन अभ्यास करत आहे, असे व्ही. गिरिराज म्हणाले. ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून ग्रामीण विकास साधण्याचा संकल्प आहे, असे राज्यमंत्री केसरकर यांनी बोलताना सांगितले.