नांदेड : जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत बोगस बियाणे, खत व कीटकनाशके विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर कृषी विभागाने बारा भरारी पथके स्थापन केली होती. या पथकाने काही दिवसांपूर्वी एकाच वेळी ठिकठिकाणी छापे मारून २८ कृषी केंद्रांवर कारवाई केली. १४ बियाणे विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले असून, १२ विविध केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.
जून महिन्यात खरीप पिकाची लागवड केली जाते. याच हंगामासाठी शेतकरी मे महिन्यापासून तयारी करतो. शेतीला लागणारे बी-बियाणे, खत, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. देगलूरसह काही तालुक्यांत पाऊस असतानाही पेरलेले बियाणे उगवले नाही, अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. शिवाय इस्लामपूर, हिमायतनगर येथे अवैध खत विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वाढत्या तक्रारी लक्षात आल्यानंतर कृषी विभागाने १२ भरारी पथके स्थापन केली. या पथकांनी नायगाव, हदगाव, नांदेड, देगलूर, कंधार, किनवट, मुखेड या तालुक्यात धाडी टाकल्या. कृषी विभागाच्या तपासणीत सेवा केंद्रातील विविध त्रुटी समोर आल्या. विक्री परवाने, दर्शन भागात न लावणे, साठा पुस्तके अद्ययावत न ठेवणे. स्रोत परवान्यात नमूद नसणे, ग्राहकांना विक्रीच्या पावत्या न देणे, विक्री अहवाल दर महिन्यात सादर न करणे इत्यादी त्रुटी आढळल्या होत्या. त्यानंतर त्याची सुनावणी घेण्यात आली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर नायगाव तालुक्यातील ८, हदगाव, मुखेड, देगलूर तालुक्यातील प्रत्येकी २, नांदेड तालुक्यातील २, कंधार तालुक्यातील १, किनवट व उमरी तालुक्यातील प्रत्येकी ५, मुदखेड तालुक्यातील ५ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली.
या शिवाय विक्री परवानगी घेतली असतानाही दुकान बंद ठेवणाऱ्यांवर या मोहिमेत विशेष लक्ष देण्यात आले आहे. खरीप हंगामात नियमानुसार सेवा मिळाव्यात यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
काही कृषी सेवा केंद्रांबाबत तक्रारी आल्यानंतर त्याची तपासणी करण्यात येत आहे. कुठे गैरप्रकार आढळल्यास कृषी विभागाला कळवावे, ज्या कृषी केंद्रावर जादा दराने विक्री होते किंवा बोगस बियाणे विकल्या जातात. याकडे आमचे विशेष लक्ष आहे. नियमभंग करणारे यांच्याविरुद्ध नियमानुसार सक्त कारवाई करण्यात येईल.- दत्तकुमार कळसाईत, जिल्हा कृषी अधिकारी, नांदेड