उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा पावसाने लवकरच हजेरी लावल्याने शेतकरी पेरणी करत आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार जवळपास २५ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पेरा सोयाबीन पिकाचा असला, तरी सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. आज काही क्षेत्राची आपण स्वत: पाहणी केली. उगवण न झालेल्या बियाणांची कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या समितीकडून चौकशी करून, यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या आढावा बैठकीसाठी ते उस्मानाबादेत आले होते. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत कृषीमंत्री भुसे बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्हाभरातून सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याबाबत एक हजारावर तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या असल्याचे सांगून. त्यानुसार कृषी विभागाकडून सदरील तक्रारीच्या अनुशंगाने पाहणी केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबत येत्या दोन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच, कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून अहवाल येताच यातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले.

जिल्ह्यातील बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या वाटपात चालढकल होत असल्याचे, सांगत असतानाच त्यांनी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी, डीडीआर, लिड बँकेचे व्यवस्थापक यांना स्पष्ट सूचना दिल्या असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाच्या परीस्थितीबाबत नाराजी व्यक्त करून, आठवडाभरात त्यात सुधारणा न झाल्यास थेट बँकनिहाय आढावा घेऊन टाळाटाळ करणाऱ्या बँकांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले असल्याचेही भुसे यांनी सांगितले.