मुंबईः आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन आणि रोबोटिक्सचा वापर करून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुमारे ४० टक्के वाढ होईल, खतांचा वापर ३० टक्क्यांनी कमी होईल आणि पाण्याची ४० ते ५० टक्के बचत होते हे पूणे आणि नाशिक जिल्हयातील प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच राज्यातील शेती शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि शाश्वत करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.
सत्ताधारी आणि विरोधकांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना भरणे बोलत होत. फेब्रुवारी महिन्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे ७८ हजार हेक्टर शेती आणि फळबागांचे नुकसान झाले असून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसाचा नेमका आकडा आल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार मदत करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
हवामानातील अनिश्चितता, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेती अधिक जोखमीची झाली आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सरकारने महाॲग्री ‘एआय’ धोरण तयार केले असून असे धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जनरेटिव्ह ‘एआय’, ड्रोन आणि रोबोटिक्सचा वापर करून शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुमारे ४० टक्के वाढ होईल असेही भरणे यांनी स्पष्ट केले.
कृषी विभागाने विकसित केलेल्या ‘महाविस्तार’ मोबाईल ॲपद्वारे पिक लागवड, रोगनियंत्रण, पाणी व खतांचा योग्य वापर आणि बाजारभाव याबाबत सल्ला मिळत असून सध्या सुमारे ३० लाख शेतकरी या ॲपचा वापर करत आहेत. तसेच स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘वसुधा’ ‘एआय’ आधारित फोन सेवा सुरू करण्यात आली असून १५५३१३ या क्रमांकावर फोन करून शेतकरी मराठीत मार्गदर्शन मिळवू शकतात असे उत्तर भरणे यांनी दिले. शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढविण्यासाठी कृषी समृद्धी योजना राबविण्यात येत असून त्यासाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना, पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी अशा विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला जात आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत ५२ हजार३१६ कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अॅग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत राज्यात शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्याचे कामही वेगाने सुरू असून आतापर्यंत १ कोटी ३१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ झाले आहे.
