लासलगाव बाजार समितीत शेतमालाचे आजपासून लिलाव

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमालाचे लिलाव प्रचलित पद्धतीनुसार सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील व सचिव बी. वाय. होळकर यांनी दिली.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमालाचे लिलाव प्रचलित पद्धतीनुसार सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याची माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील व सचिव बी. वाय. होळकर यांनी दिली. व्यापाऱ्यांमधील वादामुळे चार दिवसांपासून बाजार समितीत लिलाव बंद होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कोटय़वधींची उलाढाल ठप्प झाली होती.
स्थानिक व्यापारी संघटनेचे सभासद नसल्याने लिलावात बोली लावण्याच्या मुद्दय़ावरून निर्माण झालेल्या तिढय़ावर रविवारी सकाळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती नानासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची सभा झाली. लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे नाहक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रथम लिलाव सुरू करावेत, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. लासलगाव र्मचट्स असोसिएशनच्या सदस्यांनी कारणे दाखवा नोटिसीला उत्तर दिले आहे.
 लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे प्रथम लिलाव सुरू करावेत असे संचालक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले, असे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, लासलगाव बाजार समितीच्या मुख्य आवारात केवळ व्यापारी असोसिएशनच्या सभासदांनाच लिलावात सहभागी होण्याची परवानगी असावी, या आग्रही मागणीसाठी लासलगाव र्मचट्स असोसिएशनने लिलावात सहभागी न होण्याचे ठरविले होते. परिणामी, कांदा व इतर शेतमालाचे व्यवहार ठप्प झाले. या संदर्भात निफाडचे साहाय्यक निबंधक तसेच माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; पण व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
 अखेर बाजार समितीने १८० व्यापाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला होता. अखेर तात्पुरत्या स्वरूपात या वादावर पडदा पडला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Agriculture product auction at lasalgaon market