अहिल्यानगर: विमान इंधनाची (एटीएफ) चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ४८ लाख रुपये किंमतीच्या ४० हजार लिटर विमान इंधनासह एकूण ८८ लाख ५८ हजार ७७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
मुकेश रामअकबार सिंग (वय २६), रामभवन रामतीर्थ राजपूत (वय ३२, दोघेही रा. उत्तरप्रदेश) व चंदू शिवराम जांभळकर (वय ४१, रा. गव्हाणवाडी, श्रीगोंदे, अहिल्यानगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हरीश भीमसिंग (रा. पिंपरी, पुणे) व त्याचे इतर साथीदार फरार आहेत, त्यांचा शोध सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी सांगितले.
विमान इंधनाच्या वाहतूक करणाऱ्या टँकरचे सील तोडून त्यातील इंधन चोरी करून, त्याची विक्रीसाठी साठवणूक होत होती. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडीजवळील गव्हाणवाडी येथील हॉटेल महाराजाच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. तेथे विमान इंधनाचा अवैध साठा आढळला. इंडियन ऑइल कंपनीच्या टँकरमधून (एमएच ०४ एलक्यू ६८६५) वरील तिघे ड्रममध्ये विमान इंधन काढत असताना आढळून आले. सुमारे ४८ हजार लिटर विमान इंधन, सुमारे ४० लाख रुपये किंमतीचा टाटा कंपनीचा टँकर, २५ हजार रुपये किमतीचे इंधन काढण्याचे इंजिनसह इतर साहित्य, ३४ हजार रुपये किमतीचे १७ लोखंडी पिंप, २० हजार रुपये किमतीचे २० प्लास्टिकचे ड्रम, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
यासंदर्भात बेलवंडी (ता. श्रीगोंदा) पोलीस ठाण्यामध्ये जीवनावश्यक वस्तू कायद्यासह स्फोटके अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जतचे उपविभागीय पोलीस उपधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुयोग सुपेकर, दीपक घाटकर, संतोष खैरे, गणेश धोत्रे, उमाकांत गावडे यांनी सहभाग घेतला.
महामार्गांवर गॅस, पेट्रोल, डिझेलची वाहतूक करणारे टँकर चालक मध्येच आडबाजूला हॉटेल, धाब्याच्या जागेत थांबून टँकरचे सील तोडून अवैध साठा करतात. नंतर हा साठा काळ्याबाजारात विकला जातो. गॅस टंचाई असताना पोलिसांनी गेल्या महिन्यात अशाच स्वरूपाची कारवाई करत लाखो रुपयांचा गॅसचा अवैध साठा जप्त केला होता. आता विमान इंधनाची अशीच काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी केलेला साठा जप्त केला आहे.
