अहिल्यानगर: पोलिसांनी जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवलेला टेम्पो त्यातील अत्याधुनिक ध्वनीवर्धक साहित्यासह (डीजे साहित्य) चोरीला गेल्याची खळबळजनक घटना नगरमध्ये घडली. या संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात वाहनचोरीचा गुन्हा दोघा संशयितांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.

नगर शहराजवळील भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीत नगर तालुका पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याच्या आवारात भिंगार कॅम्प पोलीसांनी जप्त केलेला टाटा कंपनीचा टेम्पो (एमएच १६ बी  ३६५६) व त्यातील डीजे साहित्य ठेवण्यात आले होते. हा टेम्पो २ ऑगस्टच्या मध्यरात्री पावणेएक ते तीन ऑगस्टच्या सकाळी नऊ दरम्यान चोरीला गेल्याचे आढळले आहे.

भिंगार कॅम्प पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या शनिवारी (दि. १) लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती होती. या जयंतीची भिंगार उपनगरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकदरम्यान भिंगार कॅम्प पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच ध्वनीप्रदूषण कायद्यान्वये टेम्पो जप्त केला. हा टेम्पो मिरवणुकीत वाघाची तालीम मंडळाने आणलेला होता असे भिंगार कॅम्प पोलिसांकडून सांगण्यात आले.

जप्त केलेला टेम्पो त्यातील साहित्यसह पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आला होता. मात्र पोलीस ठाण्याच्या आवारातून जप्त टेम्पो पळवण्यात आल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे आवर अतिशय छोटे आहे तेथे कमी जागा आहे नगर तालुका पोलीस ठाणे तेथून जवळच आहे व ते भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतच आहे.

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अंकुश आदिनाथ कासार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भिंगार जवळीलच केकती गावातील व लगतच्या सैनिकनगर भागातील प्रत्येकी एक अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दोघांनी पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व लबाडीचे इराद्याने, पोलिसांच्या कायदेशीर रखवालीत असलेला १० लाख रुपयांचा टेम्पो व त्यातील डीजे साहित्य चोरून नेले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार म्हस्के करत आहेत. पोलिसांना चोरट्यांची नावे मिळाली असली तरी त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही.