अहिल्यानगर: भिंगारमधील विसर्जन मिरवणुकी दरम्यान झालेला लाठीमार, दीपक वाघस्कर यांचा मृत्यू संदर्भात चौकशी करण्याचे, या चौकशी दरम्यान भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल, असे आश्वासन अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी दिल्यानंतर काही मंडळांनी काल, बुधवारी मध्यरात्रीनंतर थांबवलेली विसर्जन मिरवणूक आज, गुरुवारी सायंकाळी, १८ तासानंतर मार्गी लागली. दरम्यान आज भिंगारमध्ये बंद पाळण्यात आला.

संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ‘एसआयटी’ नियुक्त करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला जाईल, वाघस्कर यांच्या मृत्यूची चौकशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडे सोपवण्यात येईल, लाठीमाराच्या घटनेची चौकशी श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे दिली जाईल, असे आश्वासन कलबुर्णे यांनी दिले.

शहरालगतच्या भिंगार छावणी परिषद हद्दीतील गणेश विसर्जन परंपरेनुसार नगर शहराच्या दोन दिवस आधी होत असते. त्यानुसार काल निघालेल्या मिरवणुकीत १५ मंडळे सहभागी झाली होती. पोलीस बंदोबस्त तैनात होता. रात्री ९ वा. अचानक गोंधळ उडाल्याने पोलिसांनी लाठीमार केला. यादरम्यान शुक्लेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष दीपक रामकिसन वाघस्कर (वय ५०) हे बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने नगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली. आमदार संग्राम जगताप यांनीही तेथे धाव घेतली.

मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर दीपक वाघस्कर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. आमदार जगताप यांनीही पोलिसांवर आरोप केले. शहर पोलीस उपाश अधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, सहकारी अधिकारी व अंमलदारांनी जाणीवपूर्वक लाठीमार केल्याचा आरोप त्यांनी केला.

वाघस्कर यांचा मृत्यू व लाठीमार घटनेच्या निषेधार्थ भिंगारमध्ये आज बंद पाळण्यात आला. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली काही काळ रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. ११ मंडळांचे गणेश विसर्जन काल रात्री झाले होते. ४ मंडळांनी विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला होता. गणेश मूर्ती असलेली वाहने त्यांनी रस्त्यावर आणून लावली होती. आज दुपारी पोलीस अधिकारी, आमदार जगताप यांची चर्चा झाली. त्यानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक कलबुर्मे यांनी आश्वासन दिल्यानंतर गणेश विसर्जन करण्यात आले.दीपक वाघस्कर यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन जिल्हा सरकारी रुग्णालयात करण्यात आले. तत्पूर्वी इनक्वेस्ट पंचनामा करण्यात आला. अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांचे स्पष्टीकरण

भिंगारमधील घटनेसंदर्भात बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले की, पोलिसांनी जेथे संमेल लाठीमार केला तेथे दीपक वाघस्कर उपस्थित नव्हते. गणेश मूर्तीच्या ट्रॅक्टरला जोडलेली ट्रॉली हलत असल्याने त्यावरील मुलांना खाली उतरवण्यासाठी त्यांच्या पायावर सौम्य लाठीमार करण्यात आला.

बंद आणि रास्तारोको

आमदार संग्राम जगताप व भिंगारमधील गणेश मंडळांनी गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आज भिंगारमध्ये बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते यांनी पाथर्डी रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. गणेश मूर्ती असलेली वाहनेही तेथे आणून लावण्यात आली होती.

अधिकारी व कर्मचारी सक्तीच्या राजेवर

भिंगार विसर्जन मिरवणुकी दरम्यान घडलेल्या घटनेची चौकशी श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.