अहिल्यानगर: राज्य सरकार व लष्करी प्रशासन यांच्यामध्ये गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेला सामंजस्य करार अखेर मार्गी लागल्याने शहराजवळील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन-२’ या योजनेअंतर्गत नगर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी २५ कोटींचा निधी गेल्या मार्च २०२५ मध्ये मंजूर झालेला आहे. किल्ला लष्कराच्या ताब्यात असल्याने हा करार करण्यात आला.
ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी, तेथे आवश्यक असलेली विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार व लष्करी प्रशासन यांच्यामध्ये यापूर्वी झालेला सामंजस्य करार सन २०२२ मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर पुन्हा सामंजस्य करार करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आता तो पुन्हा मार्गे लागल्याने भुईकोट किल्ल्यामध्ये आराखड्यानुसार कामे करण्यास जिल्हा प्रशासनाला परवानगी मिळाली आहे.
हा करार मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम जगताप यांनी प्रयत्न केले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, लष्कराचे येथील स्टेशन कमांडर पी. सुनील कुमार यांच्या उपस्थितीत लष्कराच्या येथील मुख्यालयात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, उपविभागीय महसूल अधिकारी सुधीर पाटील उपस्थित होते.
सामंजस्य करार झाल्याने स्वदेश दर्शन-२ अंतर्गत पर्यटन विकास आराखड्यातील कामे मार्गी लावण्यास वेग येणार आहे. अर्थात त्यास भारतीय पुरतत्व विभाग, वन विभाग, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीचीही आवश्यकता आहे. या कराराच्या माध्यमातून भुईकोट किल्ल्याचे स्वरूप बदलण्यास मदत होणार आहे. यापूर्वीच्या कराराअंतर्गत काही कामे मार्गी लागली मात्र बरीचशी कामी प्रलंबित होती.
किल्ल्यात होणारी कामे
ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे संवर्धन करताना पर्यटकांसाठी आधुनिक व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन या प्रकल्पात करण्यात आले आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून परिसरातील पायाभूत सुविधांपर्यंत विविध विकास कामे केली जाणार आहेत. यामध्ये भव्य प्रवेशद्वार, वाहनतळ, स्वच्छतागृहांची उभारणी, ऐतिहासिक तटबंदीचे संवर्धन, पर्यटकांना किल्ल्याचा इतिहास व वास्तूचे महत्त्व समजावे यासाठी ‘इंटरप्रिटेशन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. महत्त्वाचे आकर्षण ठरणाऱ्या कामांमध्ये बुरुज क्रमांक १ ते ११ पर्यंत सुमारे १३७० मीटर लांबीचा ‘नेचर वॉकवे’ प्रस्तावित आहे. किल्ला परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मुक्त नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. प्रकाशव्यवस्था सुधारण्यासाठी सौर उर्जेवर आधारित पथदिवे उभारण्यात येणार आहे.
संरक्षण मंत्र्यामार्फत पाठपुरावा
जिल्ह्यात पर्यटनाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे पत्र व्यवहार तसेच पाठपुरावा केला होता. यासाठी त्यांची सहकार्य मिळाले. पर्यटनातून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न असून जिल्ह्याला लाभलेला ऐतिहासिक, नैसर्गिक व अध्यात्मिक वारसा स्थळांचा विकास करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे. – राधाकृष्ण विखे, पालकमंत्री.
