अहिल्यानगर: भाजपने बिहारच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले खरे, मात्र त्याचा आनंदोत्सव साजरा करताना शहर भाजपमधील गटबाजी उघड झाली. पक्षाच्या शहरातील दोन गटांनी दोन स्वतंत्र विजयोत्सव साजरे करत गटबाजी दाखवून दिली. एका गटाने लक्ष्मी कारंजा भागातील पक्ष कार्यालयासमोर तर दुसऱ्या गटाने चौपाटी कारंजा येथे आनंदोत्सव साजरी करणारे दोन स्वतंत्र कार्यक्रम केले. दोन्ही गटांचे पदाधिकारी एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते.
पक्ष कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, पदाधिकारी महेश नामदे, निखिल वारे, प्रिया जानवे, रुद्रेश अंबाडे, ज्ञानेश्वर काळे, बाबासाहेब वाकळे, संपत नलावडे, नितीन शेलार, कालिंदी केसकर, बंटी ढापसे, सुरेखा विद्ये, रेखा मैड, सविता कोटा, अनिल बोरुडे, मुकुल गंधे, बाबा सानप, सुहास पाथरकर आदी सहभागी होते. या पदाधिकाऱ्यांनी ढोल-ताशे वाजवत, एकमेकांना लाडू भरवत विजय साजरा केला.
यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला छप्पर फाडके बहुमत मिळाले. बिहारमधील जनता विकास व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपबरोबर आहे. यशाची घोडदौड आगामी पश्चिम बंगाल व महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल. अहिल्यानगरमध्ये भाजप व मित्र पक्षांची महापालिकेत सत्ता येईल, असा दावा केला.
शहर भाजपमधील दुसऱ्या गटाने चौपाटी कारंजा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यापुढे फटाके वाजवून व नागरिकांना पेढे वाटून बिहारच्या निवडणुकीतील विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी शहराध्यक्ष मिलिंद गंधे, पदाधिकारी मयूर बोचुघोळ, प्रशांत मुथा, सचिन पारखी, वसंत लोढा, संतोष गांधी, बाळासाहेब खताडे, पियुष तावरे, पंडित वाघमारे, डॉ. दर्शन करमाळकर, राजू वाडेकर, राजेंद्र दळवी, बंटी बद्रे, मुकेश दिवाने, सुरेखा जंगम, अविनाश वाणी, दीपक दरेकर, अमित पखले, विजय एडके आदी सहभागी होते.
यावेळी बोलताना पक्षाचे माजी शहराध्यक्ष मिलिंद गंधे यांनी, आगामी अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपची ही विजयाची घोडदौड सुरूच राहील, असा विश्वास व्यक्त केला. प्रशांत मुथा म्हणाले, भाजपवर खोटे आरोप करणारे काँग्रेस व इतर विरोधकांना बिहारमधील जनतेने चांगलीच धूळ चारली आहे.
