अहिल्यानगर: भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीकडे बहुतांशी नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने प्रदेश पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत कानउघडणी केली. पक्ष चिन्हांमुळे तुम्ही आहात, याची जाणीव ठेवा अन्यथा पक्ष नेतृत्वही तुमची जाणीव ठेवणार नाही अशा शब्दात खडेबोल सुनावण्यात आले. जिल्हाध्यक्ष केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडत असल्याच्या कानपिचक्या देण्यात आल्या.

भाजपच्या शहर, दक्षिण व उत्तर अशा तीनही जिल्हा कार्यकारणीची बैठक आज, रविवारी नगर शहरात आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते तर समारोप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत झाला. जिल्हा प्रभारी राम सातपुते, शहर प्रभारी तथा प्रदेश सचिव भैरवी वाघ- पलांडे यांच्यासह आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार अक्षय कर्डिले, जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते (शहर), नितीन दिनकर (उत्तर) व दिलीप भालसिंग (दक्षिण) उपमहापौर धनंजय जाधव तसेच काही पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीला २५ पैकी अवघे ३ नगरसेवक उपस्थित होते तर ३ मंडलाध्यक्षांसह मंडळाचे सरचिटणीस व इतर प्रमुख पदाधिकारी अनुपस्थित होते. याबद्दल बोलताना पक्षाचे जिल्हा प्रभारी राम सातपुते म्हणाले, मी २५० किमी. वरून आलो, परंतु तुम्हाला येथे असून येता येत नाही. पक्ष चिन्हामुळे तुम्ही नगरसेवक आहात हे लक्षात ठेवावे. सभापती राम शिंदे पराभूत होऊनही त्यांना पक्षाने मोठे पद दिले, कारण त्यांच्यातील कार्यकर्ता जागा आहे. म्हणूनच ते बैठकीला सर्वांच्या आधी आले. ही खरे तर जिल्हाध्यक्षांची जबाबदारी आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना जाणीव करून द्यायला हवी. सभेतून आमदार निघून जातात, त्या पाठोपाठ त्यांचे कार्यकर्ते निघून जातात, हा काय प्रकार आहे? ही जबाबदारी जिल्हाध्यक्षांची आहे. आपल्या वागण्यातून पक्ष वाढायला हवा परंतु येथे चुकीचे घडत आहे.

भाजपची अवस्था ‘आप’ सारखी होईल

भाजपची ही अशीच परिस्थिती राहिली तर भाजपची अवस्था आम आदमी पक्षासारखी होण्यास वेळ लागणार नाही. दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता असूनही पक्ष पत्त्याप्रमाणे ढासळला, याची जाणीव ठेवा, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रभारी राम सातपुते यांनी दिला.

नगरसेवक ‘प्लॉट’ पाडण्यात व्यस्त

याबद्दल प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले काही नगरसेवक व्यवसायात व्यस्त आहेत काहीजण प्लॉट पाडायला गेले आहेत. काही जणांच्या हॉटेलवर धाडी पाडल्या आहेत, हॉटेल सील झाले आहेत, त्यामुळे ते कदाचित आले नसतील. परंतु हे चुकीचे आहे. नगरसेवक व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना पक्षामुळे पद मिळाले आहे, त्याचा सन्मान ठेवावा. पालकमंत्र्यांनी तर मला निरोप दिला आहे जे पक्षासाठी योगदान देतील त्यांनाच पुढील काळात पदाचा सन्मान मिळेल. सरपंच असो किंवा जिल्हा परिषद सदस्य त्याला पक्षासाठी वेळ देता येत नाही, त्याच्यासाठी पक्ष नेतृत्व वेळ देऊ शकणार नाही, अशीच ठाम भूमिका घेतली जाणार आहे.

नेत्यांच्या गाडीत बसण्यासाठी गर्दी

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची योजना राबवली. लाखो शेतकऱ्यांना फायदा दिला. मात्र राज्य सरकारच्या अभिनंदनाचे पत्र जिल्हाध्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. सरकारी समित्या आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या नियुक्तीसाठी सारख्या याद्या बदलल्या जात आहेत. नेत्यांच्या मागेपुढे केले जाते. गाडीत बसण्यासाठी गर्दी केली जाते. लवकर नियुक्तीच्या याद्या तयार झाल्या नाही तर बूथप्रमुखांना ही पदे दिली जातील, असा इशाराही प्रदेश उपाध्यक्ष विखे यांनी दिला.