अहिल्यानगर: शहराच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या संदर्भात दोन स्वतंत्र याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. पुढील सुनावणी १२ जानेवारीला ठेवली आहे. आज, बुधवारी झालेल्या महापालिका सभेतही आयुक्त यशवंत डांगे यांनी उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याची माहिती दिली.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी व न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठासमोर या दोन्ही याचिकांची सुनावणी झाली. शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे व सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी याचिका दाखल केल्या आहेत. काळे यांच्या वतीने वकील अभिजीत दरंदले व शेख यांच्या वतीने वकील यु. ए. आवटे व वकील अजिंक्य काळे यांनी बाजू मांडली. राज्य शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील एस. के. तांबे उपस्थित होते.
महापालिकेने ७ सप्टेंबरला प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला. ३० जुलै रोजी झालेल्या महापालिकेच्या सभेत या आराखड्यावर नगरसेवकांनी सूचना केल्या तर ७ सप्टेंबरला हा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या. त्यासाठी महापालिकेच्या वतीने या समितीवर तीन नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली. ९ ऑक्टोबरपर्यंत या प्रारूप आराखड्यावर किमान एक हजारावर हरकती व सूचना दाखल झाल्या आहेत.
किरण काळे यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये आराखड्यात एमआरटीपी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. ३० जुलैला झालेल्या मनपा सभेत आराखड्यातील ६३ आरक्षणे वगळण्यात आली. ५२ नवीन आरक्षण टाकण्यात आली. महासभेला अधिकार नसताना बेकायदेशीर ठराव करण्यात आला. ज्या विषयावर चर्चा झाली त्याचे इतिवृत्त व प्रत्यक्षात झालेले ठराव यामध्ये तफावत आहे. नगरसेवकांनी आराखड्यात बेकायदेशीर हस्तक्षेप करत त्यात बदल केला. त्यामुळे या आराखड्याला स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे.
दुसरी याचिका शाकीर शेख यांनी दाखल केली. त्यामध्ये महापालिकेने केलेला ठराव विखंडित तसेच महापालिका आयुक्तांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिकेतील ठरावाद्वारे आरक्षण वगळणे, नवीन आरक्षण समाविष्ट करणे, रस्ते वगळणी तसेच जमीन वापराबाबत बदल करण्याचे निर्णय घेण्यात आल्याचा, महाराष्ट्र प्राधिकरण नगररचना अधिनियमातील कलम २६ व २८ चे उल्लंघन करण्यात आले. आराखड्यात बदल सुचवणारे व नागरिकांच्या हरकती ऐकणारे सदस्य सत्ताधारी पक्षाची संबंधित आहेत, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
आयुक्तांचा दुजोरा
आज झालेल्या महापालिकेच्या सभेतही हा विषय उपस्थित करण्यात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती द्या, अशी मागणी नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली. त्यावर आयुक्तांनी आराखड्याच्या पुढील प्रक्रियेसाठी अंतरिम स्थगिती दिली आहे. महापालिकेचे म्हणणे पुढील तारखेला मांडले जाईल, असे स्पष्ट केले. उच्च न्यायालयात महापालिकेकडून चांगला वकील नियुक्त करण्याचे आदेश महापौर ज्योती गाडे यांनी दिले.
