अहिल्यानगर: जुगार पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या व मंडप टाकून आयोजित केलेल्या कोंबड्यांच्या झुंजीच्या ठिकाणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तब्बल २१ जणांना अटक केली. या झुंजीमध्ये ६० ते ७० जण सहभागी होते. त्यातील अनेकजण पसार झाले. या झुंजीसाठी आंध्रप्रदेश, तमिळनाडू व तेलंगाना येथून कोंबड्या आणण्यात आल्या होत्या.

अहिल्यानगर शहराजवळील पोखर्डी शिवारातील पिंपळगाव उजनी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंडप टाकून या कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करण्यात आल्या होत्या. तेथे ही कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींमध्ये अहिल्या नगर शहरासह नाशिक, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथील काहीजणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली.

कोंबड्यांच्या झुंजीवर पोलिसांकडून छापा टाकण्याची अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कारवाई झाल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या अधिनियमाद्वारे कारवाई केली आहे. या कारवाईत २४ हजार ६०० रुपये जप्त करण्यात आले.

कोंबड्यांच्या झुंजीचे संघटितपणे आयोजन करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या झुंजींमध्ये पैशांची बेटिंगही केले जात असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे.

या झुंजींसाठी शहराबाहेरील एकांतातील ठिकाणाची निवड केली जाते. झुंजीचे ठिकाण व वेळ मोबाईल फोन किंवा समाज माध्यमातून सांगितले जाते. प्रत्येक झुंजीवर रोख व ऑनलाईन व्यवहाराद्वारेही पैसे लावले जातात. कोंबड्यांना झुंजपूर्वी विशेष प्रशिक्षणही दिले जाते तसेच त्यांच्या पायांना धारदार ब्लेड लावून झुंज अधिक आक्रमकपणे खेळवली जाते.

झुंजीसाठी कोंबड्यांना खास तयार केली जाते. त्यांच्या विशिष्ट जाती आहेत. झुंजीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोंबड्यांची पाय मजबूत असण्याकडे लक्ष दिले जाते. चेन्नई फायटर (मिक्स लाईन), थाई गेम/ सायगॉन (उर्फ धाव्या), असेल (उर्फ कट्टर), शंभू उर्फ (सरळ फायटर), मालाय (उर्फ लॉन्ग रनर) आशा काही त्यातल्या जाती आहेत.

पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, उपनिरीक्षक अनंत सालगुडे व समीर अभंग, अमलदार सुरेश माळी, विष्णू भागवत, भीमराज खडसे, प्रशांत राठोड, सागर ससाने, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईवेळी जमलेले लोक झुंजीवर पैसे लावताना आढळले तर काहीजण कोंबड्यांची झुंज लावत होते. राज्यातील अनेक जिल्ह्यातून झुंज लावणारे आपल्या कोंबड्या घेऊन आले होते.