अहिल्यानगर: ऐन गॅस टंचाईच्या काळात घरगुती वापराचा गॅस व्यावसायिक वापराच्या गॅस टाक्यांमध्ये अवैधरित्या भरला जात असलेला (रिफिलिंग) तब्बल ५७ टन एलपीजी गॅस अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. या गॅसची किंमत सुमारे ३० लाख रुपये आहे.

 या कारवाईमध्ये ३ गॅस टँकर, टेम्पो, १८ रिकाम्या गॅस टाक्या व दोन भरलेल्या गॅस टाक्या व इतर साहित्य असा एकूण २ कोटी १ लाख ९ हजार ६२८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी या संदर्भातील माहिती दिली. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या ३ गॅस टँकरमधून भारत गॅस कंपनीच्या व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये अवैधरित्या ‘रिफिलिंग’ केले जात होते.

या कारवाईमध्ये चौघांना अटक करण्यात आली. सचिन आबा बोधले (वय ३१, दहिवडी, तुळजापूर, धाराशिव), माणिक बालाजी गुट्टे (वय ३२, दैठणे, परळी, बीड), उल्हास जीवन कवडे (वय ३२, कन्हेरवाडी, कळंब धाराशिव) व अमृत बाळासाहेब ठोकळ (वय ३३, कामरगाव, अहिल्यानगर) या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा, गॅस सिलेंडर अधिनियम व स्फोटके अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगर ते पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात (ता. अहिल्यानगर) येथील एका मिसळ विक्रीच्या वाहनतळावर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या ३ गॅस टँकरमधून गॅस रिफिलिंग होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक समीर अभंग पोलिस अंमलदार लक्ष्मण खोकले, गणेश धोत्रे, अतुल लोटके, बिराप्पा करमल, संतोष खैरे यांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या टँकरमधून अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये गॅस रिफिलिंग होत होते. गॅसची वाहतूक करणारे टँकरचालक महामार्गावर मध्येच हॉटेलच्या आडोशाला थांबून अवैद्य रिफिलिंग केंद्र चालवतात. टँकरमधून परस्पर घरगुती वापराचा गॅस व्यावसायिक टाक्यांमध्ये भरला जात आहे. गॅसची वाहतूक करताना ‘जीपीएस’चा वापर होत नाही. त्यामुळे टँकरमध्येच रस्त्यात थांबून अवैध विक्री चालक करतात. पोलिसांनी यापूर्वी सोलापूर महामार्गावर अशाच पद्धतीने टँकरमधून गॅस काढून परस्पर विक्री करणारी टोळी पकडली होती. गॅस कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅसवर मर्यादा आणल्या आहेत त्यातून अवैधरित्या व्यावसायिक वापराचा गॅस मिळवला जातो.