अहिल्यानगर: सायबर गुन्हेगारांच्या ऑनलाइन पद्धतीने लुटीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सावेडी उपनगरात लागोपाठ दोन दिवस घडलेल्या घटनांतून २८ लाख ५६ हजारांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने लुटण्यात आली. एका ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून १५ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला तर दुसऱ्या एका घटनेत ई-मेल हॅक करून उद्योजकाची १३ लाख ५६ हजारांची फसवणूक करण्यात आली.

अरविंदकुमार विनायक विसपुते (वय ७६, गुलमोहर रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ‘संदीपराव’ या नावाने व्हाट्सअप वापरकर्ता व संशयित बँक खातेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर भामट्याने अरविंदकुमार विसपुते यांना व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल केला. आपण नाशिक शहर पोलीस मुख्यालयातून संदीपराव बोलत असल्याचे त्याने सांगितले.

तुमचे बँक खाते आंतरराष्ट्रीय स्तरावर बेकायदेशीर पैशांसाठी वापरले गेले असून तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आली आहे अशी भीती व्हाट्सअप कॉल व्हिडिओ कॉल करणाऱ्या व्यक्तीने दाखवली. कारवाई टाळायची असेल तर पैसे पाठवावे लागतील, असे सांगून या सायबर भामट्याने जेष्ठाला घाबरवले. घाबरलेल्या विसपुते यांनी त्यांच्या बँक ऑफ बडोदा खात्यातून १५ लाख रुपये ‘आरटीजीएस’द्वारे सायबर भामट्याच्या खात्यावर वर्ग केले. नंतर विसपुते यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले करत आहेत.

दुसऱ्या एका घटनेचा सावेडी उपनगरातील उद्योजक संदीप काशिनाथ मोरे यांची ऑनलाईन पद्धतीने १३ लाख ५६ हजार ९५७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. सायबर भामट्याने मोरे यांच्या कंपनीचा ईमेल हॅक करून बनावट व्यवहार करत मोरे यांच्याकडील यांच्या खात्यावरील रक्कम स्वतःकडे वळवून घेतली. मोरे यांची पॉलिथर्म नावाची कंपनी आहे. या कंपनीचा ई-मेल आयडी भामट्याने हॅक केला. त्यानंतर या कंपनीच्या बनावट लेटरहेड व बँक तपशील बनवून बनावट धनादेश तयार केला. हा बनावट तपशील मोरे यांच्या सीजी पॉवर अँड सोल्युशन या ग्राहक कंपनीला ईमेलद्वारे पाठवला. ग्राहक कंपनीने मोरे यांच्या कंपनीला द्यायचे असलेले १३ लाख ५६ हजार ९५७ रुपयांची रक्कम या नवीन बँक खात्यावर वर्ग केली. रक्कम मोरे यांच्या मूळ खात्यात जमा न होता कॅनरा बँकेत भामटेच्या खात्यावर जमा झाले. त्यामुळे फसवणूक झाल्याने मोरे यांनी सायबर पोलिसांशी संपर्क करून तक्रार नोंदवली.