अहिल्यानगर : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना धमकावून खंडणी मागणाऱ्या व अटकेची भीती घालणाऱ्या (डिजिटल अरेस्ट) सराईत परंतु उच्चशिक्षित आरोपीला अहिल्यानगर सायबर पोलीस पथकाने गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागातून पाठलाग करून बेड्या ठोकल्या. चंदन दिगूराम सांगळे (वय ३०, आष्टी, गडचिरोली) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्याच्याविरुद्ध राज्यात इतर ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत.
चंदन सांगळे याने स्वतःची ओळख ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील’ अशी अहिल्यानगरमधील तक्रारदाराला करून दिली. ‘तुमच्याविरुद्ध तक्रार आली असून तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला अटक करायची नसेल, तर ५ लाख रुपये द्या,’ अशी धमकी देऊन त्याने खंडणीची मागणी केली. चंदन याने अत्यंत तांत्रिक पद्धतीने फिर्यादीला घाबरवून सोडत अटकेची भीती घातली होती. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून चंदन सांगळे यांचा शोध घेऊन पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वाखालील पथक गडचिरोलीला रवाना झाले. आष्टी (ता. चामोर्शी) परिसरात पोलीस पथकाला पाहताच आरोपी चंदन सांगळे याने आपल्या स्विफ्ट मोटारीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असूनही पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास आष्टी पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेतले.
अटक केलेला आरोपी चंदन सांगळे हा पदव्युत्तर अभियांत्रिकी शिक्षित असून, तो तांत्रिक ज्ञानाचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून विविध होस्टेल चालक, लॉज मालक यांचे संपर्क क्रमांक व माहिती प्राप्त करून, त्यांना लक्ष्य करून फसवणूक करत असे. त्याच्यावर यापूर्वी रत्नागिरी, गोंदिया जिल्ह्यातही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. चंदन सांगळे याने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल पोलीसांनी जप्त केला. अहिल्यानगर न्यायालयाने त्यास ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस निरीक्षक ढिकले, उपनिरीक्षक काकडे अंमलदार बनकर, कारखेले, अरकल, हिंगे, चालक शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. नागरिकांनी अशा प्रकारे कोणाही अनोळखी व्यक्तीच्या पोलीस अधिकारी असल्याचे सांगून केलेल्या दूरध्वनीला बळी पडू नये. संशय आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा सायबर विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

