अहिल्यानगर: पुण्यातील आयटी कंपनीच्या सॉफ्टवेअर सोर्स कोड चोरीप्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलिसांनी कारवाई करत दुबईत पसार असलेल्या संशयित आरोपीला अटक केली. मंदार प्रदीप पाथरीकर (वय ३३, रा. नवीपेठ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो दुबईत पळून गेला होता. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दुबईहून पुणे विमानतळावर आल्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला अटक केली. ‘सायबर’चे पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी सागर ढिकले यांनी ही माहिती दिली.
संशयीत आरोपी मंदार पाथरीकरला येथील न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणी नितीन गोपालदास भराडीया (वय ४२, रा. पुणे) यांनी मार्च २०२६ मध्ये अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्या होत्या. त्या आधारे दोन गुन्हे नोंदविण्यात आले. त्यापैकी एका गुन्ह्यात पाथरीकरला अटक करण्यात आली.
फिर्यादी भराडीया हे पीआरएम सॉफ्ट सोल्युशन प्रा. लि. या कंपनीत प्रमुख धोरण अधिकारी (सीएसओ) म्हणून कार्यरत आहेत. कंपनी २०१३ पासून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्याचे काम करते. वित्तीय व्यवस्थापन, डीबीटी-एसएनए प्रणाली, पीएफएमएस इंटिग्रेशन तसेच विविध वेब आणि मोबाईल अॅप्लिकेशन्स कंपनीने विकसित केले. ग्रामविकास विभागासाठी कंपनीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने २०२४ मध्ये ‘एकात्मिक एकल पोर्टल’ (एसयूपी) ही संगणकीय प्रणाली विकसित केली.
ही प्रणाली १ एप्रिल २०२५ पासून कार्यान्वित करण्यात आली. मात्र, कंपनीने केलेल्या कामाचे देयक प्रलंबित राहणे तसेच बँकेकडून करार पूर्ण करण्यात झालेल्या विलंबामुळे कंपनीने एप्रिल २०२५ मध्ये एसयूपी प्रणालीची सेवा बंद केली. सेवा बंद झाल्यानंतर बँकेकडून संबंधित प्रणालीचा सोर्स कोड देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, त्यासाठी कोणताही औपचारिक करार नसल्याचे सांगत कंपनीने सोर्स कोड देण्यास नकार दिला होता.
यानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या एका व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान बँकेकडून सादर करण्यात आलेली प्रणाली ही कंपनीने विकसित केलेल्या एसयूपी प्रणालीशी साधर्म्य असल्याचे कंपनीच्या अधिकार्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कंपनीने अंतर्गत तपास सुरू केला. या तपासात काही माजी कर्मचार्यांनी कंपनीचा अत्यंत गोपनीय डेटा अनधिकृतपणे क्लाउड प्लॅटफॉर्म, ई-मेल तसेच बाह्य हार्डडिस्कच्या माध्यमातून हस्तांतरित केल्याचे उघड झाले. विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून सॉफ्टवेअरचा सोर्स कोड कंपनीबाहेर पाठविण्यात आल्याचेही तपासात समोर आले. त्यानंतर अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
